नागपूर : रामटेक लोकसभेची शिवसेनेकडे असलेली जागा पुन्हा एकदा मोठ्या फरकाने जिंकण्याचा निर्धार करीत शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. मंगळवारी रविभवनात झालेल्या बैठकीत रामटेक लोकसभेतील प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा सुरू करण्याचे लक्ष्य निश्चित करीत जास्तीत जास्त संपर्क दौरा करण्याचे नियोजन करण्यात आले.
बैठकीत खासदार कृपाल तुमाने, जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार, चंद्रहास राऊत, अमोल गुजर, शुभम नवले, राज तांडेकर, नेहा बोकरे, प्रदीप ठाकरे, मिलिंद देशमुख, पुरोषत्तम धोटे, दिवाकर पाटणे, शिरीष गुप्ता यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी खा. तुमाने म्हणाले, प्रत्येक गावात शिवसैनिक आहेत. त्यांच्याशी संपर्क साधा. त्यांना आपली ध्येय, धोरणे पटवून सांगा. पक्ष बांधणीसाठी त्यांना सोबत घ्या. गावभेटी देऊन जनतेची कामे जाणून घ्या. ती करून देण्यासाठी पुढाकार घ्या. काम करणाऱ्यांची दखल घेतली जाईल. कार्यकर्त्यांना पदे देऊन जबाबदाऱ्या दिल्या जातील, असेही खा. तुमाने यांनी यावेळी आश्वस्त केले.
मार्चच्या अखेरीस शिवधनुष्य यात्रा
- शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्हा हातून गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाने राज्यभर शिवसंवाद यात्रेला गती दिली आहे. आता या यात्रेला उत्तर देत जनतेसमोर आपली बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवधनुष्य यात्रा निघणार आहे. ही यात्रा मार्चच्या शेवटी नागपूर जिल्ह्यात दाखल होईल. या दरम्यान नागपूर शहर किंवा रामटेक येथे मुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा घेण्याचीही तयारी सुरू आहे.
आगामी निवडणुका भाजपसोबत लढणार- नगर परिषद, नगर पचंयती, बाजार समितीच्या आगामी निवडणुका भाजपसोबत लढल्या जातील. धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळाले आहे. भाजप सोबतीला आहे. चिंता नाही. ताकदीने लढू व सर्व निवडणुका जिंकु, असा निर्धारही बैठकीत व्यक्त करण्यात आला.