नागपूरच्या जागेवर शिवसेनेचा दावा; काँग्रेसमध्ये असंतोष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 10:49 AM2023-01-12T10:49:57+5:302023-01-12T10:55:24+5:30
सुभाष देसाई, कपिल पाटील, डायगव्हाणेंनी एकत्र बसून निर्णय घेण्याचा प्रस्ताव
नागपूर : विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपासाठी बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर शिवसेनेने दावा केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही नागपूरची जागा शिवसेनेला सोडल्याचे जाहीर केले. मात्र, संबंधित प्रस्ताव मान्य करण्यात आलेला नाही, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, शिक्षक भारतीचे संस्थापक अध्यक्ष आ. कपिल पाटील व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष माजी आ. विश्वनाथ डायगव्हाणे यांनी १६ जानेवारीपूर्वी एकत्र बसून एकमताने निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव काँग्रेसकडून देण्यात आला असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
भाजपने शिक्षक भारतीचे उमेदवार नागो गाणार यांना बुधवारी सकाळी समर्थन जाहीर केले. दुपारी महाविकास आघाडीची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुभाष देसाई यांनी नागपूरची जागा शिवसेनेला सोडण्याचा आग्रह धरला.
विशेष म्हणजे या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नागपूरची जागा शिवसेनेला सोडण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. यानंतर शिवसेनेच्या नागपूर विभागातील पदाधिकाऱ्यांनी आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागपूर विभाग अध्यक्ष गंगाधर नाकाडे यांनी महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाल्याचे असल्याचे मेसेज फिरवले. यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये असंतोष वाढला.
प्राप्त माहितीनुसार आ. सुनील केदार, आ. अभिजित वंजारी, डॉ. बबनराव तायवाडे या सर्वांनीच प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी संपर्क साधत संबंधित जागा शिवसेनेला सोडण्यास विरोध केला. दरम्यान, काँग्रेसकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. ही जागा नक्कीच बदलली जाईल. योग्य उमेदवाराला समर्थन दिले जाईल, असा दावा या निवडणुकीत सक्रिय असलेल्या एका काँग्रेस नेत्याने केला आहे.
झाडे, अडबाले लढल्यास शिवसेना कशी जिंकणार?
- शिक्षक भारतीकडून राजेंद्र झाडे, तर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडून सुधाकर अडबाले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या दोन्ही संघटनांनी काँग्रेसकडे समर्थन मागितले आहे.
- झाडे व अडबाले हे दोन्ही उमेदवार लढले तर काँग्रेसने समर्थन देऊनही शिवसेनेचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे शिवसेनेने आधी हे दोन उमेदवार अर्ज मागे घेतात का यासाठी त्यांच्या संघटनेच्या प्रमुखांशी बोलावे, अशी बाजू काँग्रेसकडून मांडण्यात आली.
बुधवारी नऊ अर्ज दाखल
दरम्यान, बुधवारी एकूण सात उमेदवारांनी नऊ अर्ज दाखल केले. आतापर्यंत १३ उमेदवारांनी १९ अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेेतर्फे गंगाधर विश्वेश्वर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. वर्धा येथील अपक्ष उमेदवार रवींद्रदादा डोंगरदेव, बाबाराव उरकुडे, कास्ट्राईब महासंघ पुरस्कृत प्रा. सुषमा भड, अपक्ष उमेदवार विनोद राऊत, नरेंद्र पिपरे, वर्धा येथील महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाचे उमेदवार सतीश जगताप यांनीही अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १२ जानेवारी असून, १६ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येईल.