कार्यकर्त्यांमध्ये खदखद तर नेते म्हणतात ‘ऑल इज वेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2022 12:25 PM2022-04-07T12:25:52+5:302022-04-07T12:40:55+5:30
आपलेच सरकार असून, आपल्या पक्षातील लोकांची कामे होत नसल्याची भावना शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.
नागपूर : महाआघाडीचेच सरकार असले तरी कामे होत नसल्याची तक्रार काँग्रेसच्या २७ आमदारांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. महाविकासआघाडीतील तीनही पक्षांमध्ये सर्वच आलबेल नसल्याचे वारंवार संकेत मिळत आहेत. नागपुरातदेखील या तीनही पक्षांच्या बरेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांबाबत नाराजी आहे. कार्यकर्त्यांमध्ये खदखद असताना नेते मात्र ‘ऑल इज वेल’ असल्याचा दावा करीत आहेत.
आपलेच सरकार असून, आपल्या पक्षातील लोकांची कामे होत नसल्याची भावना शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. महामंडळांवरदेखील नियुक्त्या झालेल्या नाहीत व सातत्याने डावलण्यात येत असल्याचा सूर दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये आहे. काँग्रेसचे पदाधिकारी योग्य समन्वय साधत नसल्याचीदेखील तक्रार आहे. मात्र, याबाबत नेते उघडपणे बोलायला तयार नाहीत. तीनही पक्षांत सर्व काही ठीक असून, सातत्याने एकमेकांशी संवाद साधला जात असल्याची भूमिका नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनेला काही किंमत उरली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तीन दिशांना तीन तोंडे
नेत्यांकडून सर्व काही ठीक असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात तीनही पक्षांच्या नेत्यांची तोंडे तीन दिशेला असल्याचे वारंवार दिसून आले. पक्षांच्या बैठकांमध्ये कार्यकर्त्यांनी पुढील निवडणुका स्वबळावर लढण्याचा आग्रहदेखील धरला.
काँग्रेसशी विसंवाद नाही
तीनही पक्षांमध्ये कुठलाच विसंवाद नाही. काँग्रेसच्या नेत्यांना सांगितलेली शक्य तेवढी कामे ते करतात. काही कामांना निश्चितच उशीर झाला. मात्र, काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे काही बाबी खोळंबल्या. त्याचा फटका बाकी पक्षांनाही बसला. मात्र, बाकी सर्व ठीक आहे.
- दुनेश्वर पेठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
कार्यकर्त्यांचादेखील योग्य समन्वय
काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांचा शिवसेना व राष्ट्रवादीसोबत योग्य समन्वय आहे. तीनही पक्षांमध्ये काहीच नाराजी नाही. काही त्रुटी असल्या तर त्या दूर करण्याचा प्रयत्न होत असतो.
-विकास ठाकरे, शहराध्यक्ष, काँग्रेस