'शिवसेना तर लाचार, आमच्यावर हक्कभंग आणला तरी आवाज उठवणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 01:44 PM2019-12-16T13:44:38+5:302019-12-16T13:45:35+5:30
सभागृह दहा मिनिटांसाठी स्थगित झाले असता सावरकरांच्या संदर्भात घोषणाबाजी करीत भाजपाचे सर्व सदस्य सभागृहाबाहेर आले.
नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात आम्ही सभागृहात काढलेले गौरवोद्गार आज विधिमंडळ कामकाजातून काढून टाकले. त्यामुळे हे सभागृह भारताचे की ब्रिटिशांच्या विधानसभेचे, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. तसेच, या मुद्द्यावरील चर्चेदरम्यान सभागृहात शिवसेना आमदार शांत बसले होते. शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली असून आम्ही सावरकरांचा अवमान खपवून घेणार नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले.
सभागृह दहा मिनिटांसाठी स्थगित झाले असता सावरकरांच्या संदर्भात घोषणाबाजी करीत भाजपाचे सर्व सदस्य सभागृहाबाहेर आले. यावेळी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकार जो प्रकार करत आहे तो दुर्दैवी आहे. आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात नियम 57 ची नोटीस दिली होती. ती कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमच्या भाषणातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भातील गौरवोद्गार कामकाजातून काढून टाकले. सावरकरांबाबतचे गौरवोद्गार आम्ही काढत असताना व कामकाजातून ते वगळले जात असताना शिवसेना मात्र शांत बसली होती. शिवसेना, मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार शांत बसले होते. सावरकरांचे उद्गार कामकाजातून काढू नका असा शब्दही त्यांनी उच्चारला नाही. सत्तेच्या लाचारीमुळे शिवसैनिक गप्प असून ही लाचारी काय कामाची? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सावरकर यांच्याबद्दल बोलण्यापासून आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. हिंदुह्रदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्राचे दैवत आहे. आमच्यावर हक्कभंग आला तरी चालेल. पण, आमच्याकडून त्यांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. आमचा संघर्ष आम्ही सभागृहातही चालू ठेवू, प्रसंगी सभागृहाबाहेरही करू. जोपर्यंत राहुल गांधी या देशाची माफी मागत नाही, तोपर्यंत हा संघर्ष अविरत राहील, असेही फडणवीस म्हणाले.