कमलेश वानखेडे
नागपूर : ‘आवाज कुणाचा’ असा नारा आवाज चढवून लावणाऱ्या शिवसेनेला आपल्या अस्तित्वासाठी धडपड करावी लागत आहे. भाजपच्या साथीने नागपुरात एकेकाळी ९ नगरसेवकांपर्यंत मजल मारणाऱ्या सेनेचा बाण ताणण्यासाठी आता फक्त दोनच नगरसेवक उरले आहेत. भाजपशी युती तुटताच डरकाळी फोडणाऱ्या शिवसेनेच्या वाघाची ‘म्याऊ म्याऊ’ झाली आहे. ‘बाण’ मोडून पडला असला तरी नेते व पदाधिकाऱ्यांची आपसाताच ताणाताण जोरात सुरू आहे.
नागपुरात शिवसेनेचे संघटन आहे, पण पाहिजे तसा जनाधार मिळालेला नाही. वॉर्ड पद्धतीत २००७ मध्ये शिवसेनेने भाजपच्या मदतीने ९ नगरसेवक जिंकण्यापर्यंत मजल मारली होती. मात्र, २०१२ मध्ये दोन सदस्यीय प्रभाग होताच फटका बसला. भाजपशी युती असूनही ६ नगरसेवकच विजयी झाले. २०१७ मध्ये चार सदस्सीय प्रभाग झाला. एवढा मोठा प्रभाग शिवसेनेच्या उमेदवारांना पेलवला नाही. शिवाय भाजपनेही ऐनवेळी साथ सोडली. या निवडणुकीत शिवसेनेला स्वबळ चांगलेच कळले. फक्त दोन नगरसेवक महापालिकेत पोहोचले. आता महाविकास आघाडीत सामावून घेण्याची शक्यता कमी असल्याने तीन सदस्यीय प्रभागांत मैदान मारण्यासाठी शिवसैनिकांचा चांगलाच दम लागणार आहे.
भाजपने ताकद वाढताच उपमहापौरपदही दिले नाही
- २००७ मध्ये भाजपने युतीत शिवसेनेला दोन उपमहापौर दिले. किशोर कुमेरिया व शेखर सावरबांधे यांना उपमहापौर पदी संधी मिळाली. मात्र, २०१२ च्या निकालात ताकद वाढताच भाजपने शिवसेनेला धक्का दिला. उपमहापौर पद न देताच सभापतिपदे देऊन बोळवण केली.
जागा घटल्या, पण मतांची टक्केवारी वाढली
- २०१२ च्या निवडणुकीत शिवसेनेने ६ जागा जिंकत एकूण ३.१५ टक्के मते घेतली होती. २०१७ मध्ये शिवसेनेचे फक्त दोनच नगरसेवक विजयी झाले. चार जागा घटूनही शिवसेनेच्या मतांची टक्केवारी मात्र वाढली. शिवसेनेच्या उमेदवारांनी एकूण ५.२४ टक्के मते घेतली.
२००२
- तीन सदस्यीय प्रभाग
- भाजपशी युती तुटली.
- शंभरावर जागा लढले. दोन जिंकले.
- नगरसेवक : किशोर कुमेरिया व अलका इंगळे
- संपर्कप्रमुख : संजय निरुपम
- शहरप्रमुख : किशोर पराते
२००७
- वॉर्ड पद्धत
- भाजपशी युती
- १८ जागा लढली, ९ जिंकली
- उपमहापौर : किशोर कुमेरिया व शेखर सावरबांधे
- जिल्हाप्रमुख : सतीश हरडे
२०१२
- दोन सदस्यीय प्रभाग
- भाजपशी युती
- १८ जागा लढले, ६ जिंकले
- उपमहापौर पद मिळालेच नाही
- जिल्हाप्रमुख : शेखर सावरबांधे
२०१७
- चार सदस्यीय प्रभाग
- भाजपशी युती तुटली
- स्वतंत्र ८५ जागा लढले, २ जिंकले
- नगरसेवक : किशोर कुमेरिया, मंगला गवरे
- जिल्हाप्रमुख : सतीश हरडे