नागपूर : शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडला. नागपूर जिल्ह्यातही खासदार व आमदारांनी शिंदे गटाशी जवळीक साधली. त्यामुळे आता जिल्ह्यात जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना पदे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक निष्ठावंतांना आता आमदारकीचे स्वप्नही पडू लागले आहे. त्यासाठी काहींनी आतापासून तयारीदेखील सुरू केली आहे.
विधानसभेला चित्र आणखी बदलणार
जिल्ह्यात एकमेव रामटेक विधानसभेची जागा शिवसेनेकडे आहे. मात्र, आमदार आशिष जयस्वाल आता शिंदे गटात गेल्याने त्या जागेवर शिवसेनेला नव्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेची स्वत:ची व्होट बँक नाही. काही मतदारसंघात प्रभाव आहे, पण स्वबळावर शिवसेनेचे उमेदवार जिंकतील, अशी परिस्थिती नाही. मात्र, एवढे नक्की की शिवसेनेचे उमेदवार रिंगणात उतरले तर शिंदे गटाच्या तसेच भाजपच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढवू शकतात.
शिवसेना कितव्या स्थानावर?
२०१९ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होती. जिल्ह्यात भाजपने शिवसेनेला अधिकृतपणे एकही जागा सोडली नव्हती. रामटेकमध्ये शिवसेनेचे आशिष जयस्वाल अपक्ष लढले व विजयी झाले होते. २०१४ च्या निवडणुकीत भाजप-सेना वेगवेगळी लढली होती. त्यावेळी रामटेकचा अपवाद वगळता उरर्वरित ११ मतदारसंघांत शिवसेनेचे उमेदवार तिसऱ्या व चाैथ्या क्रमांकावर होते.
१) शिंदे गटासोबत कोण गेले ?
नागपूर शहर व जिल्ह्यात शिवसेनेचा एकमेव खासदार व एकच आमदार होता. रामटेकचे खासदास कृपाल तुमाने, रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल हे दोघेही आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत.
याशिवाय जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार यांच्यासह एक उपजिल्हाप्रमुख व दोन तालुका प्रमुख गेले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोण राहिले?
खासदार व आमदारांनी साथ सोडली असली तरी नागपूर शहर व जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी व जुने शिवसैनिक अजूनही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत. नागपूर महानगरप्रमुख प्रमोद मानमोडे, किशोर कुमेरिया, शहर प्रमुख दीपक कापसे, नितीन तिवारी यांच्यासह उपशहर प्रमुखही कायम आहेत. ग्रामीणमध्ये जिल्हाप्रमुख राजू हरणे यांच्यासोबत १३ पैकी ११ तालुकाप्रमुख शिवसनेसोबतच आहेत. नागपूरचे संपर्क प्रमुख असलेले आमदार दुष्यंत चतुर्वेदी हे देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत.
शिंदे यांच्या नेतृत्वात चमत्कार घडेल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासकामांची ग्वाही दिली आहे. जिल्ह्यातील विकासकामांचे प्रश्न निकाली काढले जातील. त्यामुळे येत्या काळात नागपूरची जनता शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेलाच साथ देईल. खासदारांसह आमदारही निवडून येतील.
- संदीप इटकेलवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)
बंडखोरांना धडा शिकवणार
निष्ठावान शिवसैनिकांचा आजही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास आहे. खासदार, आमदार गेले असले तरी बहुतांश पदाधिकारी व शिवसैनिक आहे तेथेच आहेत. उलट सर्वांनी बंडखोरांना धडा शिकविण्याची शपथ घेतली असून त्या दिशेने कामाला लागले आहेत. येत्या निवडणुकीत बंडखोर पराभूत झालेले तर निष्ठावान शिवसैनिक निवडून आलेले दिसतील.
- राजू हरणे, जिल्हा प्रमुख, शिवसेना