नागपूर : शिवसेना संपर्क मोहिमेंतर्गत पक्षाचे नेते खा. संजय राऊत यांनी बुधवारी रामटेक लोकसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. यावेळी शिवसैनिकांनी रेशीमबाग स्थित पक्षाच्या ग्रामीण कार्यालयावर शहरातील पदाधिकाऱ्यांनी ताबा घेतल्याचा आरोप लावला. तसेच आमच्याकडे कार्यालयच नाही तर भगवा कसा फडकविणार? असा सवाल उपस्थित केला.
राऊत यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. ग्रामीण कार्यकर्त्यांकडे नागपुरात कार्यालयदेखील नाही. आमचे म्हणणे कुणीही ऐकून घेत नाही, असे कार्यकर्त्यांनी म्हटले. जर ग्रामीणमध्ये शिवसेनेला विजय हवा असेल तर राऊत यांनी स्वत: नेतृत्व हाती घ्यावे, अशी मागणीदेखील कार्यकर्त्यांनी केली.
भाजप-शिवसेना युतीदरम्यान शिवसेनेला रामटेक वगळता कुठूनही स्थायी प्रतिनिधित्व मिळाले नाही. यामुळे पक्षाचा प्रभाव कमी झाला. रामटेक, कामठी, सावनेर येथे पक्षाचे उमेदवार चांगली कामगिरी करू शकतात, अशी भूमिकादेखील मांडण्यात आली.