नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडले. राज्यभरात शिवसेनेच्या आमदारांसह पदाधिकारी कार्यकर्ते सोडून गेले. नागपुरातही जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी साथ सोडत शिंदे गटात सामील झाले. या पदाधिकाऱ्यांना शिंदे गटाकडून पदेही मिळाली. मात्र, त्यानंतरही शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्ह्यात रिक्त झालेल्या एकाही रिक्त पदावर पदाधिकाऱ्यांची नेमणूक केलेली नाही. त्यामुळे पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.
शिवसेनेत जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार यांना शिंदे गटाने जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती दिली.
सहसंपर्कप्रमुख मंगेश काशीकर हे शिंदे गटाकडून नागपूर लोकसभा संपर्कप्रमुख झाले आहेत. शहरप्रमुख सुरज गोजे यांच्यावर नागपूर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय शिवसेनेत उपजिल्हाप्रमुख असलेले योगेश गोन्नाडे, विभागप्रमुख समीर शिंदे, कावरे यांच्यासह कार्यकर्त्यांना शिंदे गटाकडून तत्काळ नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. मात्र, या रिक्त झालेल्या पदांवर अद्याप शिवसेनेकडून नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत. जे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्यावरील निष्ठेपोटी कायम राहिले त्यांना न्याय देण्यासाठी मातोश्रीवरून काहीच हालचाली होताना दिसत नाहीत. खा. संजय राऊत यांनी नागपुरात येत तीन बैठका घेतल्या होत्या. मात्र, त्यांना अटक झाल्यानंतर पक्षाकडून कुणीही फिरकलेले नाही.
दिवाळीनंतर पुन्हा धमाका
- दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झालेले दिसतील. विदर्भातील युवा सेनेचे पाच जिल्हाप्रमुख संपर्कात आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झपाट्याने विस्तार झालेला दिसेल, असा दावा नागपूर लोकसभा संपर्कप्रमुख मंगेश काशीकर यांनी लोकमतशी बोलताना केला.