लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ११ मे रोजी नागपुरात विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत स्वबळावरच लढण्याचा निर्धार जाहीर केल्यानंतर आता शिवसेना सक्रीय झाली आहे. स्वबळावर लढण्यासाठी शिवसेनेने मतदारसंघनिहाय चाचपणी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या बैठकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या जोश मावळण्यापूर्वी आता संपर्कप्रमुख परिवहन मंत्री दिवाकर रावते पुढील चार दिवस विदर्भात तळ ठोकून बसणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील तयारीचा आढावा घेत मोहिमेची रणनीती आखून देणार आहेत.उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची नाागपुरात बैठक घेतली होती. या बैठकीत उद्धव यांनी पदाधिकाऱ्यांना स्वबळावर लढण्यासाठी गांभीर्याने कामाला लागण्याचे आदेश दिले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा व शिवसेना युतीत लढली. त्यावेळी शिवसेनेला विदर्भातील रामटेक, अमरावती, यवतमाळ-वाशिम व बुलढाणा या चार लोकसभा मतदारसंघात विजय मिळाला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व शिवसेना स्वतंत्र लढली. या लढाईत शिवसेना एकाकी पडली. अनेक मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारांनी दखलपात्र मतेही घेतली नाही. विदर्भात भाडपाने सेनेचा धनुष्य मोडीत काढला. असेच काहीसे चित्र यानंतर विदर्भात झालेल्या महापालिका व नगर परिषदांच्या निवडणुकीत पहायला मिळाले. शिवसेनेची साथ सोडल्यानंतरही कमळ फुलत राहिले तर बाणाचा नेम चुकत राहीला.भाजपाने विदर्भात घट्ट पाय रोवले आहेत. विदर्भ काबीज करणे तेवढे सोपे नाही याची जाणीव शिवसेनेला आहे. त्यामुळे शिवसेनेना आतापासूनच रणनीती आखत सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात संघटन कसे बळकट होईल, बाहेरील नेत्यांना पक्षात घेऊन ताकद कशी वाढवता येईल, भाजपाला अधिकाधिक नुकसान पोहचविण्यासाठी काय करता येईल, यावर शिवसेनेतर्फे बारकाईने रणनीती आखली जात आहे. याचाच एक भागद म्हणून उद्धव ठाकरेंच्या आढाव्यानंतर आता संपर्क प्रमुख परिवहन मंत्री दिवाकर रावते विदर्भातील पदाधिकाऱ्यांना चार्ज करण्यासाठी येत आहेत. रावते हे २३ मे रोजी (बुधवार) नागपुरात दाखल होतील. येथे ते रविभवनात सकाळी ११ वाजता गोंदिया- भंडारा व दुपारी २ वाजता नागपूर जिल्ह्याचा आढावा घेतील. २४ मे रोजी सकाळी ११ वाजता चंद्रपूर, दुपारी २ वाजता गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहिती घेतील.यानंतर २५ मे रोजी ते अमरावतीला रवाना होतील. तेथे सकाळी ११ वाजता शासकीय विश्राम गृहात अमरावतीचा, दुपारी २ वाजता वर्धा व सायंकाळी ४ वाजता यवतमाळचा आढावा घेतील. यानंतर २६ मे रोजी ते अकोला येथे सकाळी ११ वाजता अकोला जिल्ह्याचा आढावा होईल. दुपारी २ वाजता तेथेच वाशिम व सायंकाळी ४ वाजता बुलढाणा जिल्ह्याचाही आढावा घेणार आहेत. या सर्व बैठकांना पक्षाचे विधानसभा संपर्क प्रमुख, सहसंपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह आमदार, माजी आमदार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.संघटनात्मक आढावा घेणार- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच विदर्भाचा आढावा घेतला. त्यानंतर संपर्कप्रमुख म्हणून पाठपुरावा करणे हे आपले कर्तव्य आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक स्थिती कशी आहे, कार्यकारिणी आहे की नाही आदीचा आढावा आपण या बैठकांमधून घेणार आहेत. संघटन बांधणीसाठीच हा दौरा आहे.- दिवाकर रावते,संपर्क प्रमुख व परिवहन मंत्री
स्वबळाच्या चाचणीसाठी शिवसेना सज्ज; रावते घेणार विदर्भाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 3:05 PM
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ११ मे रोजी नागपुरात विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत स्वबळावरच लढण्याचा निर्धार जाहीर केल्यानंतर आता शिवसेना सक्रीय झाली आहे.
ठळक मुद्दे उद्धव ठाकरेंच्या बैठकीनंतर सक्रीय