लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिवसेनेच्या शहर कार्यकारिणीची नियुक्ती होऊन आठवडादेखील झालेला नसताना पक्षात अंतर्गत वादाचा सूर वाढला आहे. अनेक वर्षांपासून पक्षाशी निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप करीत सोमवारी शेकडो पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा दिला. रविभवन परिसरात शिवसेनेचे समन्वयक प्रकाश वाघ यांच्याकडे सर्वांनी राजीनामे सुपूर्द केले व यावेळी परिसरात तणाव निर्माण झाला होता.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर नागपूरचे शहर संपर्कप्रमुख आ. दुष्यंत चतुर्वेदी यांनी मागील आठवड्यात नवीन कार्यकारिणीची घोषणा केली. मात्र या कार्यकारिणीत अनेक आयारामांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळेच जुने शिवसैनिक नाराज झाले आहेत. स्थानिक नेते व शिवसैनिकांशी सल्लामसलत न करता प्रभागातदेखील ज्यांना कुणी ओळखत नाहीत अशा आयारामांना पक्षबांधणीची जबाबदारी दिली आहे. हा जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय आहे. अनेक जुन्या पदाधिकाऱ्यांची जाणूनबुजून पदावनती करण्यात आली. स्थानिक नेत्यांशी कुठलीही सल्लामसलत न करता नवीन चेहऱ्यांना जाणुनबुजून पक्षात पद देण्यात आले, असा आरोप माजी जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे व सतीश हरडे यांनी केला.
नवीन कार्यकारिणीत योग्य स्थान न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी रविभवन गाठले व तेथे समन्वयक प्रकाश वाघ यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी पदांचे राजीनामेदेखील दिले. यावेळी योगेश न्यायखोर, प्रमोद मोटघरे, संजय मोहरकर, राजेश बांडेबुचे, जगतराम सिन्हा, राजू शिर्के, पांडुरंग हिवराळे, द्वारका मोहन शहा यांच्यासह शंभरहून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते होते. हा मुद्दा पक्षनेत्यांसमोर मांडू, असे आश्वासन वाघ यांनी यावेळी नाराज पदाधिकाऱ्यांना दिले.