Neelam Gorhe News: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झाले आहे. अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेत्यांचे दावे-प्रतिदावे सुरू आहेत. यातच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीला जाणे, शिवसेना पक्ष फुटणे यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेना फुटलीच नसती. योग्य ती बाजू घेणे आणि वेळेवर कारवाई करणे, ही बाळासाहेबांची पद्धत होती. तरी संबंधितांनी शिस्त पाळली नाही, तरच कठोर होणे, हा त्यांचा पवित्रा होता, असे सांगत, एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत पक्षाने कधीही त्यांची विचारणा केली नाही. शिंदे यांचे काय प्रश्न आहेत? आमदारांना निधी मिळत नाही, ठिकठिकाच्या जिल्हाप्रमुखांची साधी मागणी होती की, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट करून द्या. पण तीही मागणी पूर्ण होत नव्हती. त्याचा दबावही एकनाथ शिंदे आणि इतर सहकाऱ्यांवर होता, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. त्या मीडियाशी बोलत होत्या.
बाळासाहेब स्वतः कार घेऊन गुवाहाटीला निघाले असते
बाळासाहेब ठाकरे असताना असा प्रसंग आला असता, तर ते स्वतः कार घेऊन निघाले असते. खुद्द बाळासाहेब कार घेऊन निघाले म्हटल्यावर सर्व आमदार परत आले असते, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंना विनंती केली होती की, जिल्हानिहाय आमदारांच्या बैठका घ्या. काही धोरणात्मक निर्णयांच्या बाबतीत आमदारांनाही निर्णयाबाबत अवगत करा, जेणेकरून आमदारांचा कामातला आत्मविश्वास वाढेल. परंतु याबद्दल काही घडले नाही. त्यामुळे शेवटी या बाबी धुमसत गेल्या आणि त्याचा स्फोट झाला. ही वस्तूस्थिती आहे. मग अशावेळी या स्फोटाला दुसरा पक्ष जबाबदार आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. जर आतमध्ये काही अस्वस्थता नसती, तर कुणाला अशी संधीच मिळाली नसती, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
दरम्यान, राजकीय इच्छाशक्ती असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविणे शक्य आहे. निवडणुकांतील महिला आरक्षण विधेयकाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसे करून दाखविले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अशी इच्छाशक्ती आहे, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.