लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिवसेनेचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईत साकारत असलेल्या स्मारकात त्यांचा पुतळा नसेल. त्याऐवजी बाळासाहेबांची कर्तबगारी नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचविणारे त्यांचे लिखाण, व्यंगचित्रे, तसेच त्यांचा सामाजिक, राजकीय व सृजनशील प्रवास मांडणारी छायाचित्रे, ध्वनीचित्रफिती या माध्यमातून जागतिक दर्जाचे स्मारक उभे केले जात आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे दिली.
लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांच्या यवतमाळ हाऊस या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे चिरंजीव व तरुण नेते, माजी मंत्री आदित्य यांच्यासमवेत बुधवारी रात्री सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि नागपूर आवृत्तीचा ५१ वा वर्धापनदिन या निमित्ताने गेल्या आठवड्यात, २१ डिसेंबरला आयोजित स्नेहमिलन समारंभाला ठाकरे उपस्थित राहू शकले नव्हते. आता विधान परिषदेतील कामकाजात सहभागी होण्यासाठी नागपूर मुक्कामी असताना त्यांनी दर्डा यांची सदिच्छा भेट घेतली. विविध विषयांवर मनमोकळी चर्चा केली. निवांत गप्पा मारल्या.
बाळासाहेबांच्या स्मारकाविषयी ते म्हणाले की, हेरिटेज इमारत असलेल्या महापौर बंगल्याच्या परिसरात होणाऱ्या स्मारकाच्या उभारणीत त्या वास्तूचे पुरातत्त्वीय महत्त्व आणि बाळासाहेबांची कर्तबगारी या दोहोंची सांगड घालण्यात येत आहे. मूळ वास्तूच्या प्रांगणात तसेच खाली तळघरात दोन मजले असा या स्मारकाचा विस्तार असेल. तथापि, त्यांचा पुतळा या स्मारकात नसेल. त्यांच्या असामान्य कर्तृत्वाची स्मृती चिरंतन राहावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
जनसमर्थनाबद्दल चिंता नाही
शिवसेनेतील बंडाळी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने चाळीसवर आमदारांनी नवा पक्ष स्थापन केल्याच्या मुद्यावर ठाकरे म्हणाले की, शिवसैनिकांच्या बळावर निवडून आलेले आमदार व खासदार पक्ष सोडून गेले असले तरी पक्षाच्या मूळ संघटनेला काहीही धक्का लागलेला नाही. उलट सामान्य जनतेत आमच्या पक्षाबद्दल सहानुभूती आहे. त्यामुळे पक्षाच्या भवितव्याबद्दल आपण निश्चिंत आहोत. त्यातही महाविकास आघाडीच्या रूपाने दोन्ही काँग्रेस आणि आमचा पक्ष राज्याचे भले करण्याच्या व्यापक हितासाठी एकत्र आल्यामुळे राज्यातील राजकारण बदलले आहे.
तिन्ही पक्षांची वैचारिक बैठक वेगळी असल्यामुळे काही मुद्यांवर वेगवेगळ्या भूमिका असणे स्वाभाविक आहे; परंतु वादाचे मुद्दे व्यापक हितासाठी बाजूला ठेवून आम्ही एकत्र आलो आहोत आणि गेल्या काही महिन्यांमधील राजकीय घटनांमुळे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष अधिक जवळ आले आहेत. या एकसंधपणाचे चांगले परिणाम मुंबई महापालिका व येणाऱ्या इतर निवडणुकांमध्ये नक्की दिसतील, असा दावा ठाकरे यांनी केला.
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला तिलांजली
- शिवसेनेतून बाहेर पडलेले लोक आणि त्यांना साथ देणाऱ्या पक्षाचा कारभार महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारा नाही.
- वैचारिक, पक्षीय लढाई आता वैयक्तिक आरोप व चारित्र्यहननाच्या पातळीवर पोहाेचली आहे. महाराष्ट्रात असे कधी झाले नाही. आमच्या घराण्याची चौथी पिढी आता राजकारणात आहे.
- राजकारणाच्या पलीकडे वैयक्तिक व कौटुंबिक स्नेह जोपासण्याचा वारसा आधीच्या पिढ्यांनी आमच्या हाती सोपविला. त्याला छेद देणारे सध्याचे राजकारण सुरू आहे, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखविली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"