सुरभी शिरपूरकर
नागपूर - गेली सहा महिने शिवसेनेने नागपूर आणि विदर्भात लक्ष केंद्रित केले आहे. गेले चार महिने प्रत्येक महिन्यात एकदा मी नागपुरात येतोय. सध्या विद्यापीठ सिनेट निवडणुकीची नोंदणी सुरु आहे. आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे शिवसेना नागपूर विद्यापीठाची सिनेट निवडणूक पूर्ण ताकतीने लढणार आहे असं युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी सांगितले.
वरूण सरदेसाई म्हणाले की, विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी चांगली नोंदणी युवासेनेने केलेली आहे. अनेक सिनेट सदस्य युवा सेनेचे संपर्कात आहेत. येणाऱ्या दिवसात ते युवासेनेसोबत येतील. युवा सेनेचा असा कुठलाही कोटा निर्धारित नाही. मात्र जर युवासेनेचा कोणी पदाधिकारी चांगला काम करत असेल तर नक्कीच त्याला महापालिका निवडणुकीसाठी संधी मिळू शकेल असं त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंची सभा अतिविराट
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संभाजीनगर या ठिकाणी अतिविराट सभा झाली. विरोधकांच्या प्रत्येक टीकेला सडेतोड उत्तर उद्धवजीने दिले. गर्दीचे सर्व रेकॉर्ड तोडणारी ती सभा होती. येणाऱ्या काळात नागपूरमध्येही उद्धव ठाकरे येतील तेव्हा गर्दीचे सर्व रेकॉर्ड तोडणारी अशीच अतिविराट सभा होईल. कोण काय म्हणतय. काय ट्विट करतय. याला महत्व नाही. सर्व प्रसारमाध्यमांनी उद्धवजींची विराट सभा लाइव्ह दाखवली. लाखो लोक या सभेत उपस्थित होते. फक्त २५ टक्केच शिवसैनिक त्या मैदानात पोहोचू शकले उर्वरित सर्व बाहेरच सभा ऐकत होते असं सांगत वरूण सरदेसाईंनी भाजपा, मनसेला टोला लगावला.
संभाजीनगर नामांतराच्या दृष्टीने पाऊल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणातच औरंगाबादच्या संभाजीनगर नामकरण करण्याबद्दल सांगितलेले आहे आणि त्यादृष्टीने पावलेही उचलली जात आहे असं वरूण सरदेसाईंनी म्हटलं.