पूर्व नागपुरात वाद : जिल्हाध्यक्षांच्या भूमिकेवर नाराजी नागपूर : शिवसेनेच्या नगरसेवकाने लावलेले विकास कामांचे बॅनर शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्याने काढून टाकल्याचा प्रकार मंगळवारी पूर्व नागपुरातील मिनीमातानगरमध्ये घडला. या मुद्यावरून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आपसातच वाद झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोटो असलेले बॅनर काढून फेकणाऱ्यांना पक्षातून निलंबित करा, अशी मागणी बॅनर लावणाऱ्यांनी जिल्हाप्रमुख सतीश हरडे यांच्याकडे लावून धरली. मात्र, हरडे यांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्याने शिवसैनिकांनी त्यांच्यावरच नाराजी व्यक्त केली. नगरसेवक जगतराम सिन्हा यांनी मिनीमातानगर, सूर्यनगर परिसरातील एका रस्त्याच्या कामाचे तीन दिवसांपूर्वी भूमिपूजन केले. या कामाचे त्यांनी परिसरात बॅनर लावले होते. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संपर्क प्रमुख आ. अनिल परब यांच्यासह शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचेही फोटो होते. मात्र, मंगळवारी संबंधित बॅनर कुणीतरी परस्पर काढून टाकल्याची माहिती सिन्हा यांना मिळाली. त्यामुळे सिन्हा यांच्यासह पूर्व नागपूरचे विधानसभा संघटन प्रमुख प्रमोद मोटघरे, संजय मोहरकर, उपविभागप्रमुख हरिभाऊ बानाईत, उपशहर प्रमुख सतीश खुळे यांच्यासह कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. या वेळी चौकशी केली असता शिवसेनेचेच स्थानिक पदाधिकारी चिंटू महाराज यांनीच त्यांचे नाव बॅनरमध्ये नसल्यामुळे संंबंधित बॅनर काढल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे संबंधितांनी चिंटू महाराज यांना घटनास्थळी बोलावून घेतले. काही वेळातच जिल्हा प्रमुख सतीश हरडे हे देखील तेथे पोहचले. या वेळी बॅनर काढल्यावरून पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलाच वाद झाला. सिन्हा यांच्यासह समर्थकांनी चिंटू महाराज यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा प्रमुख हरडे यांच्याकडे लावून धरली. यावर हरडे यांनी बॅनरमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांची नावे असावीत, प्रोटोकॉल पाळला जावा, अशी भूमिका घेतली. त्यामुळे सिन्हा समर्थक आणखीणच भडकले. वाद टोकाला जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहून शेवटी हरडे यांनी दोन-तीन तासात पूर्ववत बॅनर लावण्यासाठी सांगितले जाईल, असे सांगत सिन्हा समर्थकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सिन्हा समर्थकांनी शिवसेनेचे बॅनर काढून फेकणे हा बाळासाहेबांचा अपमान असल्याचा मुद्दा समोर करीत चिंटू महाराज यांच्या हकालपट्टीची मागणी लावून धरली.(प्रतिनिधी) संपर्क प्रमुखांकडे विषय मांडणार माझ्या निधीतून ५० लाख रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. याकामाचे बॅनर लावले होते. त्यात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांचे फोटो व नावे होती. मात्र संबंधित बॅनर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानेच काढून फेकले, ही बाब गंभीर आहे. आपण जिल्हाध्यक्षांच्या लक्षात ही बाब आणून दिल्यावरही त्यांनी दखल घेतली नाही. आता हा विषय आपण संपर्क प्रमुख आ. अनिल परब यांच्याकडे माडणार आहोत. - जगतराम सिन्हा, नगरसेवक, शिवसेना
पदाधिकाऱ्यानेच काढले शिवसेनेचे बॅनर
By admin | Published: December 28, 2016 3:30 AM