नागपूर : यवतमाळ-वाशिम व रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरून महायुतीत अद्यापही निश्चिती झालेली नसताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यवतमाळची जागा शिवसेनेचीच असून आमचाच उमेदवार महायुतीतर्फे निवडणूक रिंगणात उतरणार अशी भूमिका मांडली आहे. रत्नागिरीवर देखील त्यांनीच दावा केला आहे. नागपुरात ते बुधवारी पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.
किरण सामंत यांनी ट्विट करून निवडणूकीच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचे सोशल माध्यमांवर म्हटले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्रास होऊ नये म्हणून सामंत यांनी माघार घेतली. त्यांचा मंगळवारी रात्रीचा निर्णय भावनिक होता. मात्र ही जागा आमच्याकडेच राहावी अशी सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे. आमच्याकडून शिवसेनेकडून एकच उमेदवार आहे. मात्र अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
सोशल माध्यमांवर एखाद्या नेत्याने केलेली पोस्ट ही पक्षाची भूमिका नसते असेदेखील त्यांनी सांगितले. यवतमाळ मधून धनुष्यबाणाच्या चिन्हावरच उमेदवार निवडणूक लढवेल असेदेखील ते म्हणाले.नागपूर दौऱ्यात सामंत यांनी विदर्भाच्या दहाही जागांचा आढावा घेतला. या सर्व जागा महायुतीच जिंकेल असा दावा देखील त्यांनी केला.
उद्धवसेनेच्या तीन-चार जागा येऊ द्या!आदित्य ठाकरे यांनी रामटेकमधून कृपाल तुमाने यांना उमेदवारी नाकारल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना व एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. याबाबत सामंत यांना विचारले असता त्यांनी भाषण करत रहावे असे म्हटले. त्यांच्या पक्षाला दोन-चार जागा येऊ द्या असेदेखील ते म्हणाले. एकीकडे महायुतीने ४५ हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला आहे. दुसरीकडे सामंत यांनी तीन-चार जागा उद्धवसेनेने जिंकाव्या असे म्हटल्याने शिंदेसेनेची नेमकी भूमिका तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बर्वेंना उमेदवारी देणे हे षडयंत्रचरामटेकमधून महाविकासआघाडीतर्फे रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द होणार याची कल्पना कॉंग्रेस नेत्यांना होती. मात्र तरीदेखील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्यांचे जि.प.सदस्यत्व तसेच अर्ज रद्द झाल्यावर त्याचे खापर आता महायुतीवर फोडण्यात येत आहे. कॉंग्रेसने जाणुनबुजून हे षडयंत्र केले, असा आरोप उदय सामंत यांनी लावला.