नागपूर : धमगायेनगर येथील विद्या कृष्ण मंदिरात महाशिवरात्रीच्या पर्वावर शिवमहिमा साकारण्यात येणार आहे. पंडित अरुण द्विवेदी यांच्या मार्गदर्शनात ११ मार्चला महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकराचे पूजन करून वैदिक मंत्राने रुद्राष्टाध्याई तसेच शिवमहिमा स्तोत्रासोबत अभिषेक, पूजन करण्यात येईल. बांधकाम सुरू असलेल्या मंदिरात शिवमहिमा साकारण्यात येणार आहे. याशिवाय महिला मंडळाच्या वतीने भजन सादर करण्यात येणार आहेत. धार्मिक आयोजन गंगाप्रसाद यादव, गणेश यादव, रमेश यादव, मुन्ना यादव यांच्या वतीने संपन्न होणार आहेत.
जरीपटका हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी टेकचंदानी ()
नागपूर : जरीपटका को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवडणूक संपन्न झाली. त्यात सर्वसंमतीने चंद्रकुमार टेकचंदानी यांची अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली. यावेळी त्यांनी सध्या अध्यक्षपदाची निवड झाली असून त्यानंतर होणाऱ्या सभेत कार्यकारिणी सदस्यांची घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगितले. लवकरच सभेची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.
उड्डाणपुलावर अतिक्रमणाचे सावट ()
नागपूर : कमाल चौक ते अग्रसेन चौकाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर अतिक्रमणधारकांनी ताबा मिळविला आहे. उड्डाणपुलावर दुकाने लागत असल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाच्या वतीने काहीच कारवाई होत नसल्यामुळे अतिक्रमणधारकांचे चांगलेच फावत आहे. पूर्वी फक्त एक दुकान होते. परंतु आता हळूहळू अतिक्रमणधारकांची संख्या वाढत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
गणेशपेठ मार्गावर गडरलाईनची झाकणे तुटली ()
नागपूर : गणेशपेठ बसस्थानक ते मोक्षधाम मार्गावरील रस्त्यावर गडरलाईनची झाकणे तुटली आहेत. ही झाकणे दुरुस्तही करण्यात येत नसून ते बदलण्यासाठी कारवाई करण्यात येत नाही. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या बसेस आणि इतर वाहनचालकांना त्रास होत आहे. ही गडरलाईनची झाकणे बदलण्याची मागणी होत आहे.
पाने जाळून धूर केल्यामुळे वाहनचालकांची गैरसोय ()
नागपूर : माऊंट रोडवर रात्री येथील नागरिक झाडाची पाने जाळत आहेत. अंधार आणि धुरामुळे वाहनचालकांना समोरचे काहीच दिसत नाही. त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. नागरिकांना कुणीच मनाई करीत नसल्यामुळे ते दररोज रात्री झाडाची पाने आणि कचरा जाळत आहेत. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांवर कारवाई करून वाहनचालकांना होणारा त्रास दूर करण्याची मागणी होत आहे.
वाहनांची होतेय दुरवस्था ()
नागपूर : महाल बसस्थानकाच्या जवळ दुकानांच्या मागे भंगारातील वाहने पडलेली आहेत. अनेक दिवसापासून ही वाहने येथेच पडून आहेत. त्यामुळे त्यात पाणी जमा होऊन डासांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे ही वाहने येथून हटविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
..........