नागपूर :छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी हिंदू राष्ट्राबाबत भाष्य केले. छत्रपती शिवाजी महाराज हे काळाहून पुढचा विचार करायचे. या देशाबद्दल आपुलकीचे नाते ठेवणाऱ्यांना त्यांनी सुरक्षित केले. तेच तर हिंदवी स्वराज्य आहे आणि त्यालाच आम्ही हिंदू राष्ट्र म्हणतो असे सरसंघचालक म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
रेशीमबाग मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला कोल्हापूर येथील कणेरीतील श्री सिद्धगिरी संस्थान मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्पष्टपणे राष्ट्राच्या स्वत्वाची घोषणा केली होती आणि आम्ही इथे हिंदवी स्वराज्य स्थापन करू, असे महाराजांनी जाहीर केले होते. त्यासाठी त्यांनी प्रेरणा दिली, संस्कार दिले, जुनी मूल्ये जागृत केली. गोहत्या थांबवत मातृभाषेत राज्याचे व्यवहार सुरू केले. देशातील पहिले नौदल तयार केले व इतर धर्मांत गेलेल्यांना परत हिंदू धर्मात घेतले. त्याच हिंदवी स्वराज्याला आम्ही हिंदू राष्ट्र म्हणतो, असे सरसंघचालक म्हणाले. यावेळी प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया हेदेखील उपस्थित होते. यावेळी संघस्वयंसेवकांनी विविध शारीरिक कवायती, योग, नियुद्ध यांचे सादरीकरण केले.
राजकारण्यांनी एकमेकांवर टीका करावी. मात्र, देशाचे नाव खराब करू नये
राजकारणात विविध पक्षांमध्ये सत्तेसाठी स्पर्धा असतेच. मात्र, त्याचीदेखील मर्यादा असते याचे भान ठेवायला हवे. नेत्यांनी एकमेकांवर टीका-टिप्पणी करायला हवी. मात्र, त्यातून लोकांमध्ये विसंवाद उपस्थित होऊ नये व देशाचे नाव खराब होऊ नये एवढा विवेक तरी बाळगायला हवा. मात्र, तो विवेक काही राजकारण बाळगत नसल्याचे चित्र आहे. यामुळे जनतेमध्ये चुकीचे चित्र जात आहे, या शब्दांत सरसंघचालकांनी आपले मत व्यक्त केले.
वैभवशाली संस्कृतीचे विस्मरण ही मोठी समस्या
देशाच्या सांस्कृतिक परंपरेचे जगातील इतर देशांतील लोकांनी आचरण केले. मात्र, आपल्या लोकांनाच याचा काहीसा विसर पडत गेला. लोकसंख्या ही देशाची समस्या नाही, तर आपली परंपरा व वैभवशाली संस्कृतीचे विस्मरण ही मोठी समस्या आहे. विस्मरणात चाललेल्या आपल्या परंपरेची आठवण समाजाला करून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी केले. आपल्या देशाला उद्ध्वस्त करण्यासाठी विविध लोक तरुणांना व्यसनी बनवत आहेत. त्यात विदेशी तत्त्वांचादेखील समावेश आहे. त्यांना संघाच्या संस्कारांच्या माध्यमातूनच थांबविले जाऊ शकते, असेदेखील ते म्हणाले.
भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- कोरोना, आर्थिक संकटात भारताने चांगली कामगिरी केली.
- आपल्या देशाला वास्तवात प्रगतीसोबत ज्या जागृतीची आवश्यकता होती, त्या जागृतीला आणण्याचा प्रयत्न होत आहे.
- आपल्या देशात जातीपातींवरून अन्याय झाला आहे. त्यांचे कर्ज आपल्याला चुकवावेच लागेल.
- लहान लहान कारणांवरून एकमेकांशी संघर्ष करणे अयोग्य. सर्वांनी संयम बाळगला पाहिजे.
- शॉर्टकटने दुःख विसरण्याचा प्रयत्न केला जातो व त्यातूनच ड्रग्ज, मद्याचे व्यसन लागते.
- पर्यावरणाप्रति अपूर्ण दृष्टिकोन घेऊन भारतच नव्हे, तर जगातील लोकांनी मार्गक्रमण केले. याचा फटका बसतो आहे.
- जग भारताकडून नव्या दिशेची अपेक्षा ठेवत आहे. विवाद नव्हे, तर संवादावर भर द्यावा लागेल.