दररोज दीड हजार लोकांना लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील पूर्वीच्या १० व आठवडाभरापूर्वी सुरू झालेल्या एकूण ५ अशा १५ शिवभोजन केंद्रावरून लॉकडाऊनच्या काळात निराश्रित, निराधार नागरिकांना मोफत शिवथाळीचे वितरण सुरू आहे. वर्षभरात साडेसहा लक्ष थाळींचे वितरण झाले असून, दररोज दीड हजार लोकांना याचा लाभ मिळत आहे.
‘ब्रेक द चेन’ या मोहिमेंतर्गत कोरोना प्रतिबंधासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. ‘कडक निर्बंध’ लागल्याने घराबाहेर पडणे बंद झाले. नागपूरसारख्या कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या जिल्ह्यासाठी हे अत्यावश्यक होते. मात्र ज्यांच्याकडे स्वतःचे घरच नाही, कुठेतरी निवारा शोधून आयुष्य काढणे अशीच ज्या निराश्रितांची परिस्थिती आहे, अशा सर्व निराश्रित, रोजच्या जेवणाची भ्रांत निर्माण झालेल्यांना या काळात उपासमारीची वेळ आली. विशेषतः मोठ्या शहरामध्ये बेवारस असणाऱ्या अशा लोकांना एकप्रकारे जगविण्याचे कामच शिवथाळीने केले आहे.
राज्यातील गरीब, गरजू, जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी शिवभोजन ही योजना १ जानेवारी २०२० पासून अंमलात आली. त्यानंतर गेल्या वर्षीपासून कोरोनाने राज्यात थैमान घातले. या काळात या थाळीमुळे ज्यांना खरोखर गरज आहे, त्यांची भूक भागविल्या गेली. कारण सातत्याच्या लॉकडाऊनमुळे अनेक स्वयंसेवी संस्था व सेवाभावी काम करणाऱ्या संस्थांनाही वैद्यकीय कारणास्तव मर्यादा आल्या. मात्र शिवभोजन केंद्र अन्नपूर्णा ठरले आहे. पोटाची भूक भागविणारे हे एकमेव केंद्र ठरले आहे. त्यातही १५ एप्रिलपासून ही शिवथाळी मोफत करण्यात आली. त्यामुळे ज्यांच्याकडे कमाईचे कोणतेच साधन नाही, घर नाही, परिवार नाही, अशा सर्व निराश्रित, बेसहारा आर्थिक दुर्बल नागरिकांना यामुळे लाभ झाला आहे.
नागपूर शहरात जानेवारी २०२० ते मार्च २०२१ या काळामध्ये कार्यरत एकूण दहा केंद्रांच्या माध्यमातून ६ लक्ष ४८ हजार थाळीचे वितरण करण्यात आले. दररोज दीड हजार लोकांना या केंद्रावरून जेवण दिले जाते. एका केंद्रावरून दीडशे थाळी वितरित होते.