लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर कलेल्या शिवभोजन थाळीला नागपुरात गणेशपेठ बसस्थानक परिसरात शुभारंभ करण्यात आला. प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते फित कापून याचे उद्घाटन करण्यात आले. राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे.यावेळी पालकमंत्री राऊत यांच्या पत्नी सुमेधा राऊत, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जानकीदेवी बहुउद्देशीय संस्थेचे संचालक किशोर कुमेरिया उपस्थित होते.राज्य शासनाने जाहीर केलेल्या शिवभोजन योजनेंतर्गत राज्यात स्वस्त दरात शासकीय अनुदानप्राप्त भोजनालयातून भोजन उपलब्ध करून देण्याची योजना आहे. या योजनेंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयात दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण, भात समाविष्ट असलेली जेवणाची थाळी १० रुपये प्रति थाळी याप्रमाणे उपलब्ध असणार आहे. भोजनालय चालवण्यासाठी सद्यस्थितीत सुरू असणाऱ्या खानावळ, एनजीओ, महिला बचत गट, भोजनालय, रेस्टॉरंट अथवा मेस यापैकी सदर योजना राबविण्यास सक्षम असलेल्या भोजनालयाची निवड करण्यात आली आहे.दुपारी १२ ते २ या वेळात थाळी उपलब्धजेवण दुपारी १२ ते २ या कालावधीतच भोजनालयातून शिवभोजन थाळी मिळणार आहे. शासकीय कर्मचारी तसेच कोणत्याही आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सदर भोजनालयात सवलतीच्या दराने जेवणास सक्त मनाई आहे. प्रत्येक भोजनालयातील अन्नाचा दर्जा योग्य असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे.
शिवभोजन थाळीचा नागपुरात शुभारंभ : पालकमंत्र्यांनी केले उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 10:48 PM