वाद स्वतंत्र विदर्भाचा : अग्निहोत्री यांची हरडे यांच्यावर टीका नागपूर : शिवसेनेचे नेते सतीश हरडे यांनी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या मार्गदर्शनातच २१ वर्षे राजकारणाचे धडे घेतले आहेत. असे असताना मुत्तेमवारांवर टीका करण्याचा त्यांना अधिकार नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री यांनी केली आहे. विलास मुत्तेमवार यांनी नुकतेच विदर्भाच्या मुद्यावर पश्चिम महाराष्ट्राच्या स्वपक्षीय नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते. यावर सतीश हरडे यांनी मुत्तेमवारांनी उपदेश देणे बंद करावे, अशी टीका केली होती. हरडे यांचे वक्तव्य शहर काँग्रेसच्या जिव्हारी लागले असून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत याचा निषेध केला. मुत्तेमवार नऊ वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. मुत्तेमवारांनीच हरडेंना जनसेवेचे धडे दिले आहेत. उलट हरडेंना साधी नगरसेवकाची निवडणूक जिंकता आली नसल्याची टीका अग्निहोत्री यांनी केली. शिवसेनेने त्यांना शहराचा अध्यक्ष बनविले असले तरी त्यांच्यात संघटन मजबूत करण्याची क्षमता नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली. हरडे केवळ पब्लिसिटीसाठी काँग्रेस नेत्यांवर टीका करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. पत्रपरिषदेला नगरसेवक सुरेश जग्यासी, प्रशांत धवड, एम.एल. शर्मा, केदार शाहू, भास्कर चापले आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) अग्निहोत्रींनी शिवसेनेला उपदेश देण्याची गरज नाही उमाकांत अग्निहोत्री यांनी शिवसेनेला उपदेश देण्याची गरज नाही. त्यापेक्षा त्यांनी दयनीय अवस्थेत असलेल्या काँग्रेस पक्षाची चिंता करावी, अशी उपरोधिक टीका शिवसेनेचे डॉ. रामचरण दुबे यांनी आज येथे आयोजित पत्रपरिषदेत केली. काँग्रेसचे प्रदेश सचिव अग्निहोत्री यांनी सेनेचे जिल्हा प्रमुख सतीश हरडे यांच्यावर संघटना बांधण्याची क्षमता नसल्याची टीका केली होती. यावर तीव्र प्रतिक्रिया देत शिवसेनेने अग्निहोत्री यांना धारेवर धरले. शिवसेना पक्ष ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण अशी भूमिका ठेवून काम करतो. पक्षात जातपात पाहून उमेदवारी दिली जात नाही. त्यामुळे अग्निहोत्री यांनी आम्हाला समाजकारण शिकवू नये, असे आवाहन दुबे यांनी केले. शिवसैनिकांनी यावेळी विलास मुत्तेमवार यांच्यावरही टीका केली. मुत्तेमवार हे नऊ वेळा खासदार राहिले आहेत व मंत्रीही राहिले आहेत. तेव्हा त्यांनी विदर्भाच्या विकासासाठी काय केले, असा सवाल दुबे यांनी केला. काँग्रेसने अनेक वर्ष सत्ता उपभोगली आहे, तेव्हा त्यांना आजपर्यंत विदर्भ आठवला नाही आणि आता सत्ता गेल्यावर विदर्भाचा पुळका आल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. पत्रपरिषदेला ओमकार पारवे, राजेश कनोजिया, रविनीश पांडे, नितीन तिवारी, शरद सरोदे, गुलाबराव भोयर आदी उपस्थित होते.
मुत्तेमवारांवर टीका करण्याचा शिवसेनेला अधिकार नाही
By admin | Published: August 07, 2016 2:29 AM