लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका निवडणुकीसाठी दावेदारांचे अर्ज स्वीकारणाऱ्या शिवसेनेच्या शहर संघटनेत मोठा बदल करण्यात आला आहे. पक्षातील असंतोष दूर करण्यासाठी आता सेनेत २ महानगर आणि ३ शहरप्रमुख काम करणार आहेत. नाराज गटाच्या मागणीला मान देऊन फेरबदल करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
प्रमोद मानमोडे यांच्याकडे महानगरप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली होती, तर नितीन तिवारी आणि दीपक कापसे यांच्याकडे तीन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवून शहरप्रमुख केले होते. आता शहरात दोन महानगरप्रमुख असतील. प्रमोद मानमोडे हे दक्षिण-पश्चिम, मध्य आणि पश्चिम नागपूरचे तर माजी उपमहापौर किशोर कुमेरिया हे पूर्व, दक्षिण आणि उत्तर नागपूरचे महानगरप्रमुख असतील.
काही दिवसांपूर्वी पक्षात दाखल झालेले प्रवीण बरडे यांनाही शहरप्रमुख करण्यात आले आहे. त्यांच्याकडे पूर्व आणि मध्य नागपूरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नितीन तिवारी हे दक्षिण आणि उत्तर नागपूर तर दीपक कापसे हे दक्षिण आणि दक्षिण पश्चिम शहरप्रमुख असतील.
पक्षातील असंतोष दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा शिवसेनेच्या सूत्रांनी केला आहे. नुकतेच पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मुंबईत जाऊन महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोन महानगरप्रमुख करण्याची मागणी केली होती. तसेच समन्वय समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली.
कामाच्या आढाव्यानंतर कायमस्वरूपी नियुक्त्या
पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून करण्यात आलेल्या या नियुक्त्या सध्या प्रभारी म्हणून करण्यात आल्या आहेत. पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेऊन स्थायी नियुक्त्या केल्या जातील, असे पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
कुणाकडे कोणती जबाबदारी?
सहसंपर्कप्रमुख - मंगेश काशीकर
महानगरप्रमुख (दक्षिण-पश्चिम, मध्य आणि पश्चिम नागपूर) - प्रमोद मानमोडे
महानगरप्रमुख (पूर्व, दक्षिण आणि उत्तर नागपूर) - किशोर कुमेरिया
शहरप्रमुख (पश्चिम आणि उत्तर नागपूर) - नितीन तिवारी
शहरप्रमुख (दक्षिण-पश्चिम व दक्षिण नागपूर) - दीपक कापसे
शहरप्रमुख (पूर्व आणि मध्य नागपूर) - प्रवीण बरडे
शहर संघटक (दक्षिण, पूर्व आणि उत्तर नागपूर) - विशाल बरबटे
शहर संघटक (दक्षिण-पश्चिम, मध्य आणि पश्चिम नागपूर) - किशोर पराते