नागपूर :शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती झाली. नागपूर शहर व जिल्ह्याचा विचार करता फुटीमुळे कंबर मोडलेल्या उद्धव ठाकरे गटाला या युतीमुळे एकप्रकारे आधार मिळाला आहे. जिल्ह्यात भाजपशी युती असताना तसेही शिवसेनेला रामटेकची एकमेव जागा सोडली जात होती. त्यामुळे शिवसेना प्रत्येक मतदारसंघात स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू शकली नाही. आता ‘वंचित’ची साथ मिळाल्याने ठाकरे गटाला ऊर्जा मिळेल; पण विजयासाठी उमेदवारांचा बराच कस लागेल.
नागपूर शहर व जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण १२ जागा आहेत. यापैकी रामटेक विधानसभेची एकमेव जागा शिवसेनेला जिंकायची. मात्र, रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी उद्धव ठाकरे गटाशी फारकत घेत शिंदे गटाचा हात धरला. त्यामुळे या मतदारसंघातही ठाकरे गट कमजोर झाला आहे.
नागपूर ग्रामीणमधील काटोल, हिंगणा आणि शहरातील पूर्व नागपूर व दक्षिण नागपूर या मतदारसंघात शिवसेनेचे काही प्रमाणात अस्तित्व आहे. मात्र, काटोल वगळता या मतदारसंघांतही शिवसेनेत फूट पडली आहे. सद्यस्थितीत वंचित बहुजन आघाडीचाही जिल्ह्यात पाहिजे तसा जोर नाही. त्यामुळे अशा परिस्थीतीत दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर फारसा फरक पडेल व विजयाची समीकरणेच बदलतील, असे चित्र सध्यातरी नाही.
फुटीच्या पूर्वीही शिवसेनेचे स्व‘बळ’ कमीच
- २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना एकसंघ होता. तरी भाजपशी फारकत घेत स्वबळावर लढताच पितळ उघडे पडले. भाजपला शहरात एकूण ४ लाख ६८ हजार ३०१ मते मिळाली. शिवसेनेने सहापैकी पाच विधानसभेत उमेदवार दिले होते. त्यांना एकूण फक्त २८ हजार ५८० मते मिळाली. उत्तर नागपुरात उमेदवारच मिळाला नाही. दक्षिण नागपुरातून लढलेले किरण पांडव यांना १३ हजार ८६३ मते मिळाली होती. इतर उमेदवार १० हजार मतांचा टप्पाही ओलांडू शकले नाहीत. पश्चिम, दक्षिण-पश्चिम व मध्य नागपुरात तर पाच हजारांखाली मते मिळाली. नागपूर ग्रामीणमध्ये भाजप सावनेर वगळता उर्वरित पाच मतदारसंघांत लढली. भाजपला एकूण ४ लाख ३२ हजार ९८० मते मिळाली, तर शिवसेनेला १ लाख ६३ हजार मते मिळाली. हिंगणा व उमरेड मतदारसंघांत शिवसेना १० हजारांच्या आत, तर काटोल व कामठी मतदारसंघात १५ हजारांच्या आतच निपटली.
२०१४ मध्ये शिवसेनेला स्वबळावर मिळालेली मते
मतदारसंघ -उमेदवार - एकूण मते
पूर्व नागपूर -अजय दलाल ७४८१
पश्चिम नागपूर -विकास अंभोरे ११८०
उत्तर नागपूर -- --
दक्षिण नागपूर -किरण पांडव १३८६३
दक्षिण-पश्चिम -पंजू तोतवानी २७६७
मध्य नागपूर -सतीश हरडे ३२८९
काटोल -राजेंद्र हरणे १३६४९
सावनेर -विनोद जीवतोडे ७५४२१
हिंगणा -प्रकाश जाधव ६९९७
उमरेड -जगन्नाथ अभ्यंकर ७१८०
कामठी - तापेश्वर वैद्य १२७९१
रामटेक - आशिष जयस्वाल -४७२६२
पूर्वी शिवसेनेला आंबेडकरी मतदारांची मते अल्प प्रमाणात मिळायची. आता उद्धव ठाकरे यांच्याबाबत सहानुभूती निर्माण झाली आहे. वंचित सोबतच्या युतीमुळे ही मते आता शिवसेनेच्या झोळीत येतील. याचा दोन्ही पक्षांना नक्कीच फायदा होईल.
- राजू हरणे, जिल्हाध्यक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
रिपब्लिकन मतदारांसह बहुजन व वंचित घटकातील मतदार वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांना ५ ते १५ हजार मते मिळाली. आता शिवसेना व वंचितच्या मतांची बेरीज केली तर दखलपात्र आकडा होईल व हा आकडा राजकीय समीकरण बदलविणारा असेल.
- रवी शेंडे, शहरध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी