नागपूर - मुंबईच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची ४४ मीटरने कमी करण्याचा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्याचा धिक्कार असो अशा घोषणा देत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, अजय चौधरी यांनी निषेध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करू देणार नाही, गप्प बसणार नाही असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कोणत्याही परिस्थितीत कमी केली जाणार नाही असे जाहीर केले असताना आज केंद्रीय पर्यावरण विभागाचे एक पत्र आले असून या पत्रात पुतळ्याची उंची ४४ मीटरने कमी करण्याचे सुचविण्यात आले आहे. याबाबत शासनाने तसेच मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी शिवसेना आमदारांनी केली. या विरोधात आम्ही आज विधानसभेत आवाज उठवणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत पुतळ्याची उंची कमी केली जाऊ देणार नाही. वेळ पडली तर शासनाची तिजोरी रिकामी करावी पण हे स्मृतीस्थळ झालेच पाहिजे असे ते म्हणाले.