नागपूर : गुरुवारी सकाळी ९ वाजता नागपूर-भंडारा महामार्गावर एका शिवशाही बसला आग लागल्यामुळे खळबळ उडाली. बसमधील चालक-वाहकाने प्रसंगावधान राखून प्रवाशांना वेळीच खाली उतरविले. चालकाने अग्निशमन उपकरणाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे अप्रिय घटना टळून बसचे नुकसान झाले नाही.
गुरुवारी सकाळी नागपुरातील घाट रोड आगाराची शिवशाही बस क्रमांक एम.एच- ०९, ईएम- १२९३ ही नागपूरवरून भंडाराकडे निघाली. मौदा रोडवर सकाळी ९ वाजता अचानक बसच्या सायलेंसरच्या भागातून धूर निघू लागल्यामुळे बसच्या चालकाने तातडीने बस थांबविली. बसमध्ये एकूण ३८ प्रवासी होते. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चालक-वाहकांनी बसमधील प्रवाशांना खाली उतरविले. बसच्या चालकाने बसमध्ये उपलब्ध असलेल्या अग्निशमन उपकरणाच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले. सायलेंसरला रबरचा स्पर्श झाल्यामुळे धूर निघाल्याची माहिती एसटीच्या घाट रोड आगारातील सूत्रांनी दिली. नागपूर-अमरावती मार्गावर ४ एप्रिलला एसटी महामंडळाच्या एका शिवशाही बसला आग लागून बस जळून खाक झाली होती. ही घटना ताजी असताना तिसऱ्या दिवशीच ही घटना घडली आहे. बसचालकाच्या लक्षात वेळीच हा प्रकार आल्यामुळे मोठे नुकसान टळले आहे.
अधिकाऱ्यांनी केला माहिती दडवण्याचा प्रयत्न
नागपूर-भंडारा मार्गावर शिवशाही बसला आग लागल्याबाबत एसटीच्या नागपूर विभागातील वाहतूक अधीक्षक स्वाती तांबे यांना अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसादच दिला नाही. त्यानंतर विभाग नियंत्रक प्रल्हाद घुले यांना विचारणा केली असता त्यांनी मी सुटीवर असून अशी कोणतीच घटना आपल्या कानावर आली नसल्याची माहिती दिली. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नियंत्रण समिती ३ चे उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभणे यांनी रबर सायलेंसरला लागल्यामुळे धूर निघाल्याचे सांगितले. परंतु महामंडळाच्या इतर अधिकाऱ्यांनी मात्र ही गंभीर घटना लपवून माहिती दडवण्याचा प्रयत्न केला.