वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खासगी वाहनांच्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने मोठ्या अपेक्षेने एसटीमध्ये शिवशाहीचा समावेश केला होता. मात्र महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागांतर्गत धावणारी शिवशाही कमाईच्या बाबतीत माघारल्याचे चित्र दिसून येत आहे. बसच्या भरमसाट भाड्यामुळे प्रवाशांनी बसकडे पाठ दाखविली असून या गाड्यांमधील ६० टक्के सीट्स रिक्त राहत असल्याचे सांगण्यात येत असून शाही अंदाज असलेली शिवशाही बसेस उपराजधानीत बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.शासनाने गाजावाजा करीत ऑक्टोबर २०१७ पासून महाराष्ट्रात शिवशाही सुरू केली होती. चमकदार वातानुकूलित खासगी बसेसना टक्कर देण्यासाठीच एसटीच्या सेवेत ही शाही बस उतरविण्यात आली होती. माहितीनुसार नागपूर विभागात एसटीच्या ३५ आणि करारावर २७ शिवशाही बसेस समाविष्ट आहेत. एसटीची शिवशाही ४३ सीटर आहे तर खासगी ऑपरेटर्सशी करार केलेल्या काही बसेस स्लिपर कोच आहेत. यामधील काही गाड्या ३० सीटर तर काही ३३ सीटर आहेत. करारावर चालणाऱ्या बसेस, चालक आणि गाड्यांचे मेंटेनन्स संबंधित ऑपरेटर्सकडे असते. दुसरीकडे बसचे वाहक आणि डिझेलच्या जबाबदारीसह प्रतिकिमी १९ रुपये एसटी महामंडळाकडून भरले जातात. शिवशाही बसेसचे भाडे खासगी आॅपरेटर्सच्या तुलनेत ३० टक्के अधिक असल्याचे सांगण्यात येते. माहितीनुसार नागपूर ते पुणेपर्यंत शिवशाही स्लीपर कोचचे भाडे १४७५ आणि पुश बॅक सीट बसचे भाडे १३७० रुपये आहे. तेच खासगी ऑपरेटर्सचे याच मार्गावरील भाडे अनुक्रमे ७०० ते ११०० रुपये आहे. कमी भाडे आणि सामानाच्या सुविधेमुळे प्रवाशी खासगी बसेसना प्राधान्य देत असतात. एसटीचे नागपूर विभागीय नियंत्रक अशोक वरठे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, पावसाळ्यात प्रवाशांची संख्या कमीच असते. पावसाळ्यानंतर प्रवाशांच्या संख्येत वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवशाहीची विशेषताशिवशाही बसेस वातानुकुलित असून यामध्ये एअर सस्पेंशन व व्हीटीएस सिस्टीम लावण्यात आले असून याद्वारे बसचे लोकेशन सहज लक्षात येते. अधिकारिक सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवशाहीच्या चार बसेस दुर्घटनाग्रस्त झाल्या आहेत. साध्या बसेस चालविणाºया चालकांना या बसेस चालविण्यात अडचण येते. बसेस संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी एसटीच्या घाट रोड स्थिती वर्कशॉप आणि विभागीय नियंत्रक कार्यालयात संपर्क करण्यात आला मात्र या बसेसच्या उत्पन्नाबाबत कुणीही आकडे जाहीर करण्यास तयार नाही. मंगळवारी याबाबत प्रयत्न केला असता बहुतेक अधिकाऱ्यांनी मिटींगमध्ये असल्याचे कारण देत माहिती सांगण्यास नकार दिला.