लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बहुसंख्य ऐतिहासिक, पौराणिक कादंबरीकार हे प्राचीन काळातील प्रथा, परंपरांना गौरविण्यात गुंतलेले असतात. चांगला लेखक हा मिथकाचे भंजन करणारा असतो. वाईट प्रथा परंपरांना सोडून त्यातील सकस असे काही शोधता येईल का, वर्तमान काळातील प्रश्न भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर सोडविता येतील का, असा विचार करणाऱ्या काही थोड्या लेखकांमध्ये डॉ. रवींद्र शोभणे यांचा समावेश होतो, असे गौरवोद्गार प्रसिद्ध साहित्यिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.डॉ. रवींद्र शोभणे यांना वयाच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त मित्र परिवारातर्फे बुधवारी त्यांचा सपत्नीक (प्रा. अर्चना शोभणे) सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. विदर्भ साहित्य संघाच्या चौथ्या माळ्यावरील सभागृहात आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, डॉ. अनिल बोपचे, विजय प्रकाशनचे सचिन उपाध्याय, बबनराव तायवाडे व शरयू तायवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. राजेंद्र सलालकर व डॉ. अनिल बोपचे यांच्या ‘मराठी कादंबरी : परंपरा आणि चिकित्सा’ हा गौरवग्रंथ तसेच डॉ. अनिल बोपचे यांच्याद्वारे डॉ. रवींद्र शोभणे यांच्या निवडक कथांचे संपादन असलेल्या ‘महत्तम साधारण विभाजक’ हा ग्रंथ व डॉ. शोभणे यांच्या ‘गोत्र’ या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. डॉ. कोत्तापल्ले पुढे म्हणाले, टीव्हीवर चालणाºया चर्चा निरर्थक असतात व लोकांचे खरे प्रश्न त्यातून गहाळ झाले आहेत. खेड्यातला माणूस जाणता झाल्याशिवाय हा देश पुढे जाणार नाही. त्यामुळे ग्रामीण माणसांच्या जाणिवा विकासित करणे गरजेचे आहे. डॉ. शोभणे यांनी ‘कोंडी’ व ‘पांढरं’ याकादंबऱ्यांमधून ग्रामीण जीवनाचे विदारक वास्तव मांडून हे काम केले आहे. डॉ. शोभणे हे कैची व सुई घेऊन आलेले लेखक आहेत, पण त्यांनी माणसं जोडली. संत साहित्य व भारतीय साहित्यावर प्रभाव पाडणारे संत नामदेव यांची उपेक्षा झाली तशी त्यांचा वारसा चालविणाºया डॉ. शोभणे यांचीही उपेक्षा झाली, अशी खंतही त्यांनी मांडली. शिक्षक म्हणून ते निवृत्त झाले आहेत, लेखक म्हणून नाही. लेखक हा समाजाचा शिक्षक असतो व यापुढे ते समाजशिक्षकाची भूमिका सांभाळतील, अशी शुभेच्छा त्यांनी व्यक्त केली. यावेळी इतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त करीत अभिष्टचिंतन केले.प्रा. अर्चना शोभणे यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांच्या संसाराची बेरीज-वजाबाकी मांडली. सत्काराला उत्तर देताना डॉ. शोभणे यांनी हा कृतार्थतेचा क्षण असल्याची भावना व्यक्त केली. कैची व सुई घेऊन नागपूरला आलो होतो, आता ४० वर्षांचा प्रवास आठवतो. अहंकाराला मर्यादा हवी व हे सूत्र मी पाळले. आजोबा शाहीर होते व आई-वडील वारकरी होते, हाच वारसा आपल्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मित्र, लेखक, प्रकाशक व कुटुंब असा प्रेमाचा गोतावळा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र सलालकर यांनी केले. संचालन शुभदा फडणवीस यांनी केले.