कुलपती रमेश बैस यांना धक्का, सुभाष चौधरी यांचे निलंबन रद्द; हायकोर्टाचा निर्णय
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: March 14, 2024 02:04 PM2024-03-14T14:04:25+5:302024-03-14T14:05:36+5:30
कुलपती सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी डाॅ. सुभाष चाैधरी यांना राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरून निलंबित करण्याचा वादग्रस्त आदेश अवैध ठरवून रद्द केला. त्यामुळे कुलपती रमेश बैस यांना मोठा धक्का बसला.
न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व मुकुलिका जवळकर यांनी विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता हा निर्णय दिला. कुलपती या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने कुलपतींच्या विनंतीवरून हा निर्णय चार आठवड्याकरिता स्थगित ठेवला. त्यानंतर ही स्थगिती आपोआप रद्द होईल, असेही स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी या प्रकरणावर अंतिम सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखिव ठेवला होता.
बैस यांच्या कार्यालयाला चाैधरी यांच्याविरुद्ध विविध तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यावर सखोल चौकशी पूर्ण होतपर्यंत चौधरी यांना निलंबित करण्यात आले होते. बैस यांनी यासंदर्भात गेल्या २१ फेब्रुवारी रोजी आदेश जारी केला होता व गडचिरोली येथील गाेंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. प्रशांत बाेकारे यांच्याकडे नागपूर विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला होता. त्याविरुद्ध चौधरी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका मंजूर करण्यात आली. विद्यापीठाने काळ्या यादीत टाकलेल्या एमकेसीएल कंपनीला कंत्राट देणे, निविदा न काढता वेगवेगळ्या कामांचे कंत्राट वाटप करणे, प्राध्यापकांकडून पैसेवसुलीच्या प्रकरणात अडकलेले जनसंवाद विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. धर्मेश धवनकर यांची पाठराखण करणे, यांत्रिक अभियांत्रिकी शाखेतील डॉ. प्रशांत कडू यांची आंतरविद्याशाखा अधिष्ठातापदी निवड करणे इत्यादी तक्रारी चौधरी यांच्याविरुद्ध आहेत. आमदार प्रवीण दटके यांनीही चौधरी यांच्या कार्यपद्धतीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते.