सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अपघाताच्या घटना व तांत्रिक बिघाड टळून विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी स्कूल बसला ‘फिटनेस सर्टीफिकेट’ असणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु काही स्कूलबस मालकांनी फिटनेसचा नियमही धाब्यावर बसवला आहे. शहरातील ८२६ स्कूल बसपैकी १४३ स्कूलबस फिटनेसशिवाय रस्त्यावर धावत आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.उपराजधानीत राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना मंगळवारपासून सुरुवात झाली तर ‘सीबीएसई’ शाळा सुरू होऊन आठवडा होत आहे. या शाळांमधील सुमारे ४० टक्के विद्यार्थी स्कूल बस, ३० टक्के विद्यार्थी स्कूल व्हॅन तर १० टक्के विद्यार्थी हे आॅटोरिक्षांमधून प्रवास करतात. एवढ्या मोठ्या संख्येत विद्यार्थी वाहतूक करीत असल्याने या वाहतुकीला संवेदनशील वाहतूक म्हणून नोंद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन विशिष्ट नियमावली तयार करण्यात आली आहे. यात स्कूल बस व स्कूल व्हॅनच्या रंगापासून ते आसन क्षमता व वेगावरील मर्यादाही आखून दिली आहे. न्यायालयाचा आदेश व परिवहन विभागाच्या निर्देशानुसार शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूलबस व स्कूल व्हॅनची वाहन योग्यता तपासणी प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत (आरटीओ) दरवर्षी करणे बंधनकारक आहे़ उन्हाळी सुट्यांच्या कालावधीत फेरतपासणी करण्याबाबत परिवहन विभागाच्या सूचना आहेत. परंतु स्कूल बसच्या फिटनेसला घेऊन स्कूलबस मालक गंभीर नसल्याचे चित्र आहे.याला प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने गंभीरतेने घेतले आहे. ‘फिटनेस सर्टिफिकेट’ नसलेल्या स्कूल बसचा परवाना निलंबनाचे आदेश वायुपथकाला दिले आहे.
वर्षातून एकदा फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारकस्कूलबसेसना वर्षातून एकदा फिटनेस प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. वाहनाची स्थिती, परवाना, चालक गाडी चालवण्यास सक्षम आहे का, वाहनमालक व चालकांवर कोणता गुन्हा नोंद झाला आहे का, वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे कोणती शिक्षा झाली आहे का, शिवाय वाहन व मालकाची कागदपत्रे आदींची तपासणी करण्यात येते. या सर्व बाबी तपासल्यानंतरच आरटीओकडून फिटनेस प्रमाणपत्र (योग्यता प्रमाणपत्र) देण्यात येते. ते मुदतीच्या आत मिळवणे बंधनकारक आहे.
नोटीस बजावूनही दुर्लक्षचनागपूर शहर आरटीओ कार्यालयांतर्गत ८२६ स्कूल बस नोंदणीकृत आहेत. यातील ६८३ स्कूल बसेसला ‘फिटनेस’ प्रमाणपत्र देण्यात आले आहे.उर्वरित १४३ स्कूल बसने अद्यापही हे प्रमाणपत्र घेतले नसल्याने ‘आरटीओ’ कार्यालयाने गेल्याच आठवड्यात कारणे दाखवा नोटीस बजावली. परंतु त्यानंतरही या स्कूल बसेस फिटनेस तपासणीसाठी आल्या नाहीत. विशेष म्हणजे, यातील बहुसंख्य स्कूल बसेस विद्यार्थ्यांची ने-आण करीत असल्याने त्या धोकादायक ठरत आहे.
परवाना निलंबनाचे निर्देश१४३ स्कूल बसने फिटनेस प्रमाणपत्र घेतले नसल्याचे आढळून आले आहे. यामुळे बुधवारपासून स्कूल बस तपासणी मोहीम हाती घेण्याचा सूचना वायुपथकाला दिल्या आहेत. ज्या स्कूल बसला फिटनेस प्रमाणपत्र नसेल त्याचा परवाना निलंबित करण्याचे निर्देशही दिले आहे.-अतुल आदे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर