नागपूर : मागील काही कालावधीत महिला अत्याचाराचा मुद्दा परत ऐरणीवर आला असताना नागपुरातील महिलांसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये या वर्षी वाढ दिसून आली आहे. २०१९ व २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये एकूण गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. विशेषत: महिला अत्याचारांचे वाढलेले प्रमाण चिंतेची बाब आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत दर महिन्याला शहरात ११० गुन्हे दाखल झाले आहेत. यात महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांची संख्या १८ इतकी आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकाराअंतर्गत नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१९ ते ३१ ऑगस्ट २०२१ या कालावधीत महिलांसंदर्भातील किती गुन्ह्यांची नोंद झाली, याबाबत त्यांनी प्रश्न विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, महिला अत्याचारांचे २०१९ मध्ये १३६ (दर महिन्याला ११) तर २०२० मध्ये १७२ (दर महिन्याला १४) गुन्हे नोंदविले गेले. २०२१ मध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत १४९ गुन्हे (दर महिन्याला १८) नोंदविण्यात आले. महिला अत्याचाराप्रमाणेच विनयभंग व अपहरणाच्या गुन्ह्यांची संख्यादेखील वाढली आहे. विनयभंगाचे २०१९ व २०२० मध्ये अनुक्रमे ३३९ व ३२३ गुन्हे (दर महिन्याला २८ व १६) नोंदविले गेले होते. २०२१ मध्ये या दरात वाढ झाली व आठच महिन्यांत २२९ गुन्ह्यांची (दर महिन्याला २९) नोंद झाली.वर्षभरात अपहरण कसे वाढले?२०१९ मध्ये शहरात महिला अपहरणाचे ४०४ गुन्हे दाखल झाले होते. २०२० मध्ये ही संख्या २४६ वर गेली. २०२१ च्या पहिल्या आठ महिन्यांतच महिला अपहरणाची संख्या वाढली. जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत २३९ महिला अपहरणांची नोंद झाली.
एकूण गुन्ह्यांत १५ टक्क्यांनी वाढ२०१९ साली महिलांसंदर्भातील १,२५२ गुन्हे (दर महिन्याला १०४) दाखल झाले होते. २०२० मध्ये हा आकडा १,१५२ वर (दर महिन्याला ९६) गेला. मात्र २०२१ मध्ये आठ महिन्यांतच ८८५ गुन्हे नोंदविल्या गेले. दर महिन्याला सरासरी ११० गुन्हे दाखल झाले व महिलांसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी वाढ दिसून आली.