लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जास्त संक्रामक आणि आजाराला घातक रूप देणारा ‘डेल्टा प्लस व्हेरिएन्ट’ची ओळख असली तरी प्रत्यक्षात अद्यापही असा कुठलाही धोका झाल्याचे दिसून आलेले नाही. सोमवारी या ‘व्हेरिएन्ट’चे विदर्भात २१ रुग्ण आढळून आले. यात नागपूर जिल्ह्यातील ५, गडचिरोली व अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी ६, यवतमाळ जिल्ह्यातील ३ तर भंडारा जिल्ह्यातील १ रुग्ण आहे. विशेष म्हणजे, या सर्व रुग्णांचे जुलै महिन्यात नमुने घेतले असून, कोरोनातून बरे झाले असल्याचे सांगण्यात येते. (21 Delta Plus patients in Vidarbha)
कोरोनाचा दुसऱ्या लाटेला ‘डेल्टा’ हा कोरोना विषाणूचा प्रकार कारणीभूत ठरला. तिसऱ्या लाटेला बदललेल्या विषाणूचा प्रकार ‘डेल्टा प्लस’ राहणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे या विषाणूच्या बाधित रुग्णांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सोमवारी राज्यात ‘डेल्टा प्लस’चे २७ नवे रुग्ण आढळून आले. त्यातील २१ रुग्ण विदर्भातील असून, नगरमधील ४ तर नाशिकमधील २ रुग्णांचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लस रुग्णांची संख्या १०३ झाली आहे.
- धंतोलीतील २, मंगळवारी व हनुमाननगर झोनमधील प्रत्येकी १ रुग्ण
मनपाच्या आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी सांगितले, धंतोली झोनअंतर्गत वसाहतीमधील दोन, मंगळवारी व हनुमाननगर झोनअंतर्गत वसाहतीमधील प्रत्येकी एक तर जिल्हाबाहेरील म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील एका रुग्णाच्या तपासणीत ‘ङेल्टा प्लस व्हेरिएंट’ आढळून आला आहे. या सर्व रुग्णांचे नमुने जुलै महिन्यात पाठविले होते. हे सर्व रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यापासून आजारही पसरला नसल्याची प्राथमिक माहिती आहे. परंतु खबरदारी म्हणून पुन्हा एकदा तपासण्या केल्या जाणार आहेत.
-आढळलेले रुग्ण
अमरावती : ६
गडचिरोली : ६
नागपूर : ५
यवतमाळ : ३
भंडारा : १