नागपूर : पर्यावरण संवर्धनासाठी झाडांची काळजी घेणे आवश्यक आहे; परंतु, सी-२० परिषदेची तयारी करीत असलेल्या प्रशासनाने झाडांना इजा पोहोचविणारी धक्कादायक कृती केली आहे. शहरात रोषणाई करण्यासाठी सुमारे तीन हजार झाडांना तब्बल एक लाखावर खिळे ठोकण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी महानगरपालिका अधिकाऱ्यांविरुद्ध वृक्ष संवर्धन कायद्याचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण व पर्यावरणाची हानी हे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
वर्धा रोड ते विमानतळ, विमानतळ टी-पॉईंट ते आरबीआय चौक, रहाटे कॉलनी टी-पॉईंट ते दीक्षाभूमी, अलंकार चौक ते जीपीओ चौक आणि आरबीआय चौक ते तेलंगखेडी उद्यान व फुटाळा तलाव रोडवरील दोन्ही बाजूच्या झाडांवर रोषणाई करण्यासाठी २० कोटी रुपये खर्च केला जात आहे. विविध प्रकारचे लाइट लावण्याकरिता झाडांना खिळे ठोकण्यात आले आहेत. काही पर्यावरणप्रेमींनी झाडांचे निरीक्षण केले असता प्रत्येक झाडांना सुमारे ३० खिळे ठोकले गेल्याचे व फांद्याही तोडण्यात आल्याचे आढळून आले. त्यामध्ये सिव्हिल लाइन्स येथील अनेक हेरिटेज झाडांचासुद्धा समावेश आहे.
२०२१ मध्ये पर्यावरण संवर्धन संस्थांच्या मागणीमुळे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी झाडांना ठोकलेले खिळे व बॅनर्स काढण्यासाठी मोहीम राबविली होती. तसेच, खिळे ठोकणाऱ्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. असे असताना ही बेकायदेशीर कृती करण्यात आली. त्यामुळे यासंदर्भात सखोल चौकशी करण्याची, तसेच किती पक्षांची घरटी नष्ट करण्यात आली, हेदेखील शोधून काढण्याची गरज आहे, असे बोलले जात आहे. खिळे ठोकल्यामुळे झाडांना बुरशी लागते. त्यामुळे झाडे वाळू शकतात.