सुमेध वाघमारे
नागपूर : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने सात महिन्यात २३ हजार ८० विद्यार्थ्यांच्या मुखाची तपासणी केली. यात आठवी, नववी, दहावीच्या ५२ टक्के विद्यार्थ्यांना तंबाखूचे व्यसन असल्याचे आढळून आले. धक्कादायक म्हणजे, यातील १५.१ टक्के विद्यार्थी हे मुख कर्करोगाच्या उंबरठ्यावर असल्याचे निदान झाले.
नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने ट्रायबल कमिशनर, नागपूर व इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीने व्यापक तंबाखू नियंत्रण कार्यक्रम हाती घेतला आहे. नागपूर जिल्ह्यासह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमधील शाळाशाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची दंत व मुख तपासणी मोहीम उघडली. याची सुरुवात २० नोव्हेंबर २०२२ रोजी नागपूर शहरातील एका मनपा शाळेतून झाली. १२ एप्रिल २०२३ पर्यंत चाललेल्या या मोहिमेत १८४ शाळांमधून २३ हजार ८० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यातील १२ हजार १०४ विद्यार्थ्यांना तंबाखू खाण्याचे व्यसन असल्याचे आढळून आले. यातीलच ३ हजार ४८७ विद्यार्थ्यांना मुख पूर्व कर्करोग असल्याचे पुढे आले. आतापर्यंत ४ हजार २३७ विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले असून २८८ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली.
- आठवी ते दहावी विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूचे प्रमाण अधिक
मोठ्यांच्या व्यसनाकडे आकर्षित झालेले अबोध मन, जाहिरातींचा प्रभाव, संगतीचा परिणाम, सहजपणे उपलब्ध होणारे तंबाखूजन्य पदार्थ आणि एकदा चव घेण्याचा मोह, आदी कारणांमुळे आठवी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांचे प्रमाण वाढल्याचे या तपासणीत आढळून आले.
- गडचिरोलीतील सर्वाधिक विद्यार्थ्यांना मुखपूर्व कर्करोग
या मोहिमेत तपासणी करण्यात आलेल्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये गडचिरोली येथील सर्वाधिक एक हजार ४१६ विद्यार्थ्यांना मुख पूर्व कर्करोग असल्याचे निदान झाले. त्यानंतर भामरागड येथील ७२६, अहेरी येथील ४१२, देवरी येथील ३५२, चंद्रपूर येथील २९०, नागपूर येथील १४०, वर्धा येथील ६३, चिमूर येथील ५७, भंडारा येथील १३ विद्यार्थ्यांना हा मुख पूर्व कर्करोग असल्याचे दिसून आले.
- ४३ टक्के मुलींमध्ये तंबाखूचे व्यसन
तपासणी करण्यात आलेल्या २३ हजार ८० विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू खाण्याचे प्रमाण मुलींमध्ये ४३ टक्के तर मुलांमध्ये ५९ टक्के आहे.
- २२ टक्के विद्यार्थी खातात खर्रा
५६.५ टक्के विद्यार्थ्यांना कुठलेही व्यसन नव्हते. मात्र २२.४ टक्के विद्यार्थ्यांना खर्र्याचे, १४.५ टक्के विद्यार्थ्यांना तंबाखूचे, २.५ टक्के विद्यार्थ्यांना बिडी व सिगारेटचे, २.४ टक्के विद्यार्थ्यांना सुपारीचे तर १.७ टक्के विद्यार्थ्यांना पान खानाचे व्यसन होते.
विद्यार्थ्यांचा मुख व दंत तपासणीतून पुढे आलेले मुख पूर्व कर्करोगाच्या रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे. लहान वयात झालेला मुख पूर्व कर्करोग साधारण दहा वर्षांनंतर मुखाच्या कर्करोगात बदलतो. यामुळे या रुग्णांना कर्करोगाकडे जाऊ न देण्याचा व नवे आयुष्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- डॉ. अभय दातारकर, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय