योगेश पांडे
नागपूर : मागील चार महिन्यांत नागपुरातून तब्बल ९१८ लोक बेपत्ता झाल्याचे किंवा हरविल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या. यातील अर्ध्याहून अधिक तक्रारी महिला हरविल्याच्या होत्या. त्यातही २१ वर्षांखालील मुलींचे प्रमाण हे एकूण महिलांच्या तुलनेत ३५ टक्क्यांहून अधिक आहे. या आकडेवारीकडे लक्ष टाकले असता विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
‘लोकमत’ला प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते एप्रिल या कालावधीत शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ९१८ लोक हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील ४८० महिला व ४३७ पुरुष हरविल्याच्या तक्रारी होत्या.
२१ वर्षांखालील २०९ लोक गायब
शहरात २१ वर्षांखालील २०९ लोक बेपत्ता झाले. त्यातील बहुतांश जण घरातून निघून गेले होते. यात मुलींची संख्या १७१ इतकी होती तर मुलांचा आकडा ३८ इतका होता. घरातून निघून जाण्याची वेगवेगळी कारणे होती.
ज्येष्ठ पुरुषांचे प्रमाण अधिक
विविध कारणांमुळे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील नागरिकदेखील गायब होण्याचे प्रमाण जास्त दिसून आले. या वयोगटातील ७३ जण हरविल्याच्या तक्रारी आल्या. त्यातील १८ महिला होत्या व ५५ पुरुष होते.