नागपूर : उपराजधानीत महिला व प्रामुख्याने अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अगोदर शिक्षक, त्यानंतर चौकीदाराने मुलींवर अत्याचार केल्यानंतर आता एका कामगाराने अवघ्या चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. चॉकलेटचे आमिष दाखवत त्याने मुलीवर अत्याचार केला. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी नराधम कामगाराला अटक केली आहे.
गोलू उर्फ हरीओम शिवदयाल सनोडिया (२४, कोराडी) असे आरोपीचे नाव आहे. गोलू हा मुळचा मध्यप्रदेशमधील बंडोल येथील आहे. त्याच्या कुटुंबात पत्नी व दोन मुले असून तो वीटभट्टीवर कामगार म्हणून काम करतो. त्याच्याच परिचयातील मध्यप्रदेशातीलच एक कुटुंबदेखील त्याच्याच झोपडीजवळ वास्तव्यास आहे. त्या दांपत्याला चार वर्षांची मुलगी आहे. जवळच राहत असल्याने दोन्ही कुटुंबांची ओळखी आहे. १५ एप्रिल रोजी मुलीचे आईवडील कामासाठी बाहेर गेले होते व तिच्याजवळ लहान भाऊ होता. तर गोलूदेखील तेव्हा घरीच होता. दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्याची नजर मुलीवर पडली. त्याने तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखविले व तो तिला झोपडीच्या मागे घेऊन गेला व तिच्यावर अत्याचार केला.
मुलगी वेदनेने रडायला लागली. घरचे लोक तिला दवाखान्यात घेऊन गेले. मात्र डॉक्टरांना शंका आली व त्यांनी तिला काय घडले याची विचारणा करण्यास पालकांना सांगितले. आईने तिला विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकून पालक चांगलेच हादरले. त्यांनी कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गोलूविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे.