- योगेश पांडे नागपूर - डॉक्टर असलेल्या वडिलांच्या मृत्यूनंतर भाऊ व बहीण कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षण नसताना दवाखाना चालवत होते व रुग्णांच्या जीवाशी एकाप्रकारे खेळच करत होते. मागील दीड महिन्यांपासून मोमीनपुरा येथील अन्सारनगर येथे हा प्रकार सुरू होता. महाराष्ट्र कॉन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनच्या पत्रानंतर नागपूर महानगरपालिकेला जाग आली व त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
जैद साजिद अन्सारी (२३, तकीया दिवाणशहा, मोमीनपुरा) व समन साजिद अन्सारी अशी आरोपींची नावे आहेत. ते दोघेही कुठल्याही वैद्यकीय शिक्षणाशिवाय दवाखाना चालवत असल्याची तक्रार महाराष्ट्र कॉन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनच्या मुंबई कार्यालयात झाली होती. तेथून पत्र आल्यानंतर नागपूर मनपाच्या गांधीबाग झोनचे वैद्यकीय अधिकारी विजयकुमार तिवारी हे मंगळवारी तहसील पोलीस ठाण्यातील पथकासह अन्सारनगर येथील सय्यद क्लिनिक येथे पोहोचले. तेथे जैद अन्सारी बसला होता. तिवारी यांनी त्याला वैद्यकीय शिक्षणाच्या प्रमाणपत्राबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर त्याने कुठलेही शिक्षण झाले नसल्याची कबुली दिली. त्याचे वडील डॉ.साजिद इक्बाल अन्सारी हे क्लिनिक चालवायचे. त्यांचा दीड वर्षांअगोदर मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर जैद व त्याची बहीण समन यांनी दवाखाना चालवायला घेतला. डिसेंबर २०२३ पासून दोन शिफ्टमध्ये ते रुग्णांवर उपचार करत होते. त्यांनी शेकडो रुग्णांचा जीव या माध्यमातून धोक्यात घातला. तिवारी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दवाखान्यात औषधे व वैद्यकीय साहित्यसंबंधित क्लिनिकमध्ये आरोपींनी स्टेथोस्कोप, बीपी मशीन यांच्यासह वैद्यकीय साहित्य ठेवले होते. याशिवाय तेथे इंजेक्शन, औषधे, सलाईन देखील ठेवले होते.