सुमेध वाघमारे
नागपूर : रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो. हे अनेकांना माहीत असतानाही एचआयव्हीबाधित रक्तदान करीत असल्याने रक्ताची गरज असलेल्या रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातील शासकीयसह खासगी रक्तपेढीतून मागील वर्षी ४१ हजार ८१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यातील ५७ रक्ताच्या बॅगमध्ये एचआयव्हीचे विषाणू आढळून आले.
नागपुरातीलच थॅलेसेमिया व सिकलग्रस्त चार मुलांना रक्तातून ‘एचआयव्ही’ची लागण झाली. यातील एकाचा मृत्यू झाला. दूषित रक्त दिल्याने ‘हेपॅटायटीस सी’ची पाच जणांना, तर ‘हेपॅटायटीस बी’ची दोन मुलांना लागण झाली. ही सर्व मुले १० वर्षांखालची आहेत. ‘लोकमत’ने हे वृत्त सर्वप्रथम प्रकाशात आणले. याची दखल ‘राष्ट्रीय मानवाधिकार आयोगा’ने घेऊन याबाबत महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना तसेच राज्याच्या अन्न व औषध विभागाच्या सचिवांना नोटीसही बजावली आहे. यामुळे दूषित रक्ताचा पुरवठ्याचा गंभीर प्रश्न पुढे आला आहे.
-५१६ रक्त पिशव्या दूषित
रक्तदात्याला रक्तदान करण्यापूर्वी रक्त संक्रमण अधिकाऱ्याने एकापेक्षा अधिक स्त्रियांशी असुरक्षित शारीरिक संबंध ठेवण्यात आले होते का, शरीरावर टॅटू गोंदला होता का, दात काढताना किंवा दाढी करताना वापरण्यात आलेली उपकरणे नवीन संसर्गरहित होती का असे प्रश्न विचारणे गरजेचे आहेत. परंतु रक्तदान शिबिरांमध्ये तसे होताना दिसून येत नाही. यामुळेच मागील वर्षी रक्तदानातून मिळालेल्या ४१ हजार ८१ रक्त पिशव्यांमधून ५१६ (१.२५ टक्के) रक्त पिशव्या दूषित आढळून आल्या आहेत.
-८४ पिशव्यांमध्ये गुप्तरोगाचे, तर १७ पिशव्यांमध्ये मलेरियाचे विषाणू
रक्तदात्याकडून रक्त घेतल्यानंतर रक्तपेढीकडून त्या रक्ताची एचआयव्ही, ‘हेपॅटायटिस बी’ व ‘सी’, गुप्तरोग व मलेरियाची तपासणी केली जाते. या सर्व तपासण्या निगेटिव्ह आल्यावरच गरजू रुग्णांना रक्त दिले जाते. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, उपलब्ध झालेल्या ४१ हजार ८१ रक्त पिशव्यांमधून ५७ पिशव्यांमधून एचआयव्ही, २२५ पिशव्यांमधून ‘हेपॅटायटिस बी’, १३३ पिशव्यांमधून ‘हेपॅटायटिस सी’, ८४ पिशव्यांमधून गुप्तरोगाचे तर १७ पिशव्यांमधून मलेरियाचे विषाणू आढळून आले.
- विंडो पिरियडमधील विषाणूचे निदानच होत नाही
रक्तदाता हा एचआयव्ही किंवा हेपॅटायटिसचा विंडो पिरियडमध्ये असेल तर रक्तपेढ्यांमध्ये होणाऱ्या ‘एलायझा’ चाचण्यांमध्ये या चाचण्या निगेटिव्ह येतात. विंडो पिरियडमधील हेच संक्रमित रक्त अनेकांसाठी घातक ठरत आहे. म्हणूनच ‘नॅट टेस्टेड’ रक्ताची मागणी होऊ घातली आहे.
-त्या रक्तदात्याला उपचाराखाली आणले जाते
रक्तपेढीच्या तपासणीत एचआयव्ही, हेपॅटायटीस, गुप्तरोग किंवा मलेरियाचे विषाणू आढळून आलेल्यांची माहिती रक्त संक्रमण परिषदेला दिली जाते. येथील अधिकारी त्या रुग्णांशी संपर्क करून त्यांचे समुपदेशन करून त्यांना उपचाराखाली आणले जाते. दूषित रक्त नष्ट केले जाते.
-डॉ. रविशेखर धकाते, प्रभारी उपसंचालक, आरोग्य विभाग, नागपूर