नागपूर : दीर आणि वहिनी यांच्यात प्रेमाचे सुत जुळले आणि दाेघेही ९ जून राेजी घरून निघून गेले. ते बेपत्ता असल्याची तक्रारही पाेलिसात नाेंदविण्यात आली. त्यातच भंडारबाेडी (ता. रामटेक) गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भीमनटाेला गावालगत असलेल्या मॅग्नीज खाणीच्या खाेल खड्ड्यातील पाण्यात गुरुवारी (दि. ७) सकाळी दाेघांचाही मृतदेह तरंगताना आढळून आला. दाेघांनीही बुधवारी (दि. ६) खड्ड्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
लक्ष्मण गुलाबराव धुर्वे (२७) व मैनावती असुराज धुर्वे (३८) दाेघेही रा. भीमनटाेला, ता. रामटेक अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्यात सख्खे चुलत दीर व वहिनीचे नाते असल्याच माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली असून, पाेलिसांनी याला दुजाेरा दिला आहे. दाेघेही ९ जून राेजी घराबाहेर पडले हाेते. त्यानंतर ते घरी परत न आल्याने आसुराज धुर्वे याने मैनावतीचा सर्वत्र शाेध घेतला. ही कुठेही आढळून न आल्याने त्याने मैनावती बेपत्ता असल्याची पाेलिसात तक्रार नाेंदविली हाेती.
दरम्यान, दाेघेही बुधवारी (दि. ६) भीमनटाेला येथे परत आले हाेते. समाज आपल्याला स्वीकारणार नसल्याची जाणीव आल्याने दाेघेही गावालगतच्या मॅग्नीज खाणीच्या खड्ड्याजवळ गेले. दाेघांनीही त्यांच्या बॅग, चप्पल व माेबाइल फाेन खड्ड्याच्या काठावर ठेवले आणि पाण्यात उडी घेतली. मैनावतीचा मृतदेह बुधवारी सायंकाळी तर लक्ष्मणचा मृतदेह गुरुवारी सकाळी मृतदेह तरंगताना आढळून आल्याने नागरिकांनी पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून दाेन्ही मृतदेह बाहेर काढले व उत्तरीय तपासणीसाठी रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणले. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास पाेलीस उपनिरीक्षक उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार करीत आहेत.
लक्ष्मण अविवाहित तर आसुराजचे दुसरे लग्न
लक्ष्मण धुर्वे हा अविवाहित असून, मैनावतीचा पती आसुराज धुर्वे याचे दुसरे लग्न हाेय. आसुराजच्या पहिल्या पत्नीचा बाळंतपणात मृत्यू झाल्याने आसुराजने मैनावतीशी दुसरे लग्न केले. आसुराजला पहिल्या पत्नीपासून तीन मुली तर मैनावतीपासून एक आठ वर्षाचा मुलगा आहे. लक्ष्मण व मैनावतीचे प्रेमसंबंध हाेते. दाेघेही गावाला परत आल्यानंतर समाज आपल्याला स्वीकारणार नाही, अशी भीती त्यांना वाटत हाेती.