नागपूर: तुम्ही अनेकदा टीव्हीवर किंवा प्रत्यक्षात विषारी साप पाहिले असतील. पण, मानवी वस्तीत क्वचितच साप दिसून येतो. सध्या सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे, ज्यात एका कुरिअरच्या बॉक्समधून कोब्रा साप निघाल्याची घटना घडलीय. नागपूरच्या ज्ञानेश्वर नगरमध्ये राहणाऱ्या सुनील लखेटे यांच्यासोबत ही घटना घडली. त्यांनी बंगळुरुवरुन काही सामान मागवलं होतं, सामानाचे बॉक्स घरी आले. त्यांनी बॉक्स उघडताच त्यातून एक विषारी कोब्रा साप बाहेर पडला.
बंगळुरुवरुन मुलीचे सामान मागवलेसुनील यांची मुलगी बंगळुरुमध्ये नोकरी करायची, पण वर्क फ्रॉम होम असल्यामुळे ती मागील अनेक दिवसांपासून घरुन काम करू लागली. त्यामुळे त्यांनी बंगळुरुमधील मुलीचे सर्व सामान परत मागवले. एका प्रसिद्ध कुरिअर कंपनीने त्यांना बॉक्समध्ये भरुन हे सामान नागपूरला पाठवले. कंपनीच्या कुरिअर बॉयने सर्व बॉक्स लखेटे यांच्या घरी पोहोचवले. त्यांनी हे बॉक्स उघडताच त्यात त्यांना एक विषारी कोब्रा साप दिसला.
बॉक्समधून साप नाल्यात पळालायादरम्यान साप त्या बॉक्समधून बाहेर आला आणि नाल्यात पळाला. यानंतर लखेटे कुटुंबियांनी सापाला शोधण्यासाठी सर्पमित्राला फोन केला, पण सर्पमित्रालाही तो साप काही सापडला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या बॉक्समध्ये साप निघाला, त्या बॉक्सला छिद्र पडलेलं होतं. त्यामुळे याच छिद्रातून साप आत शिरल्याचा अंदाज लावला जातोय. हा साप पळून गेला असला तरी, सध्या लखेटे कुटुंबात भीतीचे वातावरण पसरले आहे.