नागपूर : रविवारच्या दिवशी दोन भावांनी एका तरुणाची दिवसाढवळ्या हत्या केली. आरोपी व मृत दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. टी शर्टवरून झालेल्या वादातून ही हत्या झाली असून, यामुळे खळबळ उडाली आहे. शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.शुभम हरणे (वय २७, रामसुमेरबाबानगर) असे मृताचे नाव आहे, तर प्रयाग आस्वले व अक्षय ऊर्फ लख्खा आस्वले असोले हे आरोपी आहेत. कावरापेठ परिसरातील एका बारसमोर ही हत्या करण्यात आली.
शुभम हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता आणि गेल्या काही दिवसांपासून तो आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी परिसरात दहशत निर्माण करीत होता. प्रयाग आणि अक्षय यांच्यावरही फौजदारी खटले दाखल आहेत. आरोपी व मृतक ओळखीचेच होते. दोन दिवसांपूर्वी दारूच्या नशेत ऑनलाइन बोलविलेल्या टी शर्टवरून वाद झाला व शुभमने अक्षय ऊर्फ लख्खाला झापड मारली होती. त्यांच्यात अगोदरदेखील वाद झाला होता. नुकत्याच झालेल्या वादाचे निराकरण करण्यासाठी आरोपींनी शुभमला फोन करून बारसमोर भेटण्यास बोलविले.
दरम्यान, तरुणांमधील वाद विकोपाला गेला आणि यामध्ये शुभम हरणे याची हत्या करण्यात आली.