संजय लचुरिया
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयातील ‘एसएनसीयू’मध्ये लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर शासनाचे डोळे उघडले व सर्व रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र प्रत्यक्ष अनेक सरकारी विभागांची कार्यालये असणाऱ्या प्रशासकीय इमारत क्रमांक २ कडे बहुतेक अद्यापही शासनाचे लक्ष गेलेले नाही. दररोज हजारो लोकांचे येणे-जाणे असणाऱ्या या इमारतीत चक्क वर्षभरापूर्वीच ‘एक्स्पायर’ झालेली अग्निरोधक उपकरणे वापरण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. ‘लोकमत’ने या इमारतीची पाहणी केल्यावर दोन माळ्यांवर तर अशीच उपकरणे वापरण्यात येत आहेत. आपत्कालीन स्थितीत आगीवर नियंत्रण कसे आणणार, असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे.
नियमानुसार अग्निरोधक उपकरणे दरवर्षी बदलले गेले पाहिजेत. यासंदर्भात सर्वसाधारणत: खासगी कंपनीकडे कंत्राट दिले असते. मात्र प्रशासकीय इमारतीतील तळमजला, पहिला व दुसरा मजला येथे पाहणी केली असता आगीपासून बचावासंदर्भातील बाबीत प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये किती हलगर्जीपणा आहे हे दिसून आले. तीनही मजल्यांवर २५ नोव्हेंबर २०१८ रोजी ‘रिफिल’ करण्यात आलेली अग्निरोधक उपकरणे दिसून आली. यांची ‘एक्स्पायरी’ची तारीख १४ डिसेंबर २०१९ ही होती. ही तारीख उलटून आज १ वर्ष १ महिन्याहून अधिक कालावधी झाला आहे. प्रत्येक उपकरणाच्या ‘इन्स्पेक्शन कार्ड’वर हीच तारीख नमूद आहे. मात्र तरीदेखील ही उपकरणे ‘रिफिल’ करण्याची तसदी कुणीही घेतलेली नाही.
अधिकारी झोपेत आहेत का ?
प्रशासकीय इमारतीच्या परिसरात दररोज हजारो लोक येत असतात. अशा स्थितीत येथे आपत्कालीन घटना घडली तर मोठा धोका होऊ शकतो. भंडाऱ्याच्या घटनेनंतर सरकार दरबारी ‘फायर ऑडिट’ची चर्चा रंगली असताना प्रशासनातीलच अधिकाऱ्यांनी ते काम करत असलेल्या इमारतीतील अग्निशमन यंत्रणा ‘अप टू डेट’ आहे की नाही हे तपासण्यासाठीदेखील पुढाकार घेतलेला नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे. तेथे येणाऱ्या सामान्य लोकांनादेखील ही ‘एक्स्पायरी’ची बाब लक्षात येत असताना अधिकारी झोपेत आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
...तर दस्तावेजच धोक्यात
प्रशासकीय इमारत दोनमधील दुसऱ्या माळ्यावर नगर भूमापन अधिकारी क्रमांक एकचे कार्यालय आहे. या कार्यालयात जमिनीशी संबंधित नोंदींची कागदपत्रे ठेवलेली असतात. या माळ्यावर लावण्यात आलेले अग्निरोधक उपकरणदेखील मागील वर्षीच ‘एक्स्पायर’ झालेले आहे. जर या ठिकाणी आगीची घटना घडली तर हजारो सदनिकांशी संबंधित दस्तावेजच धोक्यात येण्याची भीती आहे.