नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी देणाऱ्या जयेश पुजारी उर्फ शाकीर कांथा याने कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांना जीवे मारण्याची सुपारी घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. लष्कर-ए-तोयबा आणि पीएफआय या दहशतवादी संघटनांनी त्याला ईश्वरप्पांची सुपारी दिली होती. मात्र, त्याअगोदरच तो या प्रकरणात अडकला. आता, याप्रकरणी आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. जयेश हा जन्मठेपेची शिक्षा भोगत असून तो लष्कर ए-तोएबासाठी काम करायचा.
जयेश हा PFI आणि लष्कर ए-तोएबासाठी काम करत होता. तो एका गूगल पे नंबरवर पैसे मागवायचा. तो एका मुलीचा तो अकाऊंट नंबर होता, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. जयेश हा बेळगाव जेलमध्ये आजीवन कारावासाची शिक्षा भोगत होता. परंतु, त्या आधीच तो PFI संघटनेचा संपर्कात आला होता. त्याने PFI या संघटनेसाठी अजून कोणत्या घटनांसाठी काम केलंय, त्याची चोकशी पोलीस आता करणार आहेत. नागपुर पोलिसांच्या तीन टीम तपासासाठी नागपूरवरून निघणार आहेत. दोन टीम बेळगाव आणि बंगळुरू इथल्या जेलमध्ये जाऊन तपास करणार आहेत. तर तिसरी टीम त्या गुगल पे अकाऊंटबदल माहिती गोळा करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिसांकडून मिळाली आहे.
जयेशने त्याच्या एका साथीदाराला कारागृहातून बाहेर काढून शस्त्रांसाठी पैसेही उपलब्ध करून दिले होते. जयेशचे कर्नाटक आणि दक्षिण भारतातील बहुतांश शहरांमध्ये मजबूत दहशतवादी 'नेटवर्क' होते. त्यामुळेच त्याला ही सुपारी देण्यात आली होती. सुमारे सहा महिन्यांपूर्वी बेळगाव कारागृहातून जामिनावर सुटलेल्या रझियाच्या प्रियकराला त्याने शस्त्रे खरेदी करण्यासाठी पैसे दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली. जयेश आणि त्याचे साथीदार खून करण्याची संधी शोधत होते.
दरम्यान, गडकरींच्या कार्यालयात फोन केल्यानंतर जयेश नागपूर पोलिसांच्या 'टार्गेट'वर आला. ईश्वरप्पा हे कर्नाटक भाजपचे प्रभावी नेते आहेत. शिमोगा मतदारसंघातून ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या हत्येच्या सुपारीचे वृत्त समोर आल्यानंतर कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.