नागपूर : बनावट कागदपत्रे तयार करून तरुण मुलांची विदेशात मानवी तस्करी करणाऱ्या नागपुरातील १० दाम्पत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सर्व आरोपी पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेकानाका भागातील रहिवासी असून, त्यांनी गेल्या १० वर्षात नागपुरातील ५० मुलांना इंग्लंड (यूके) विदेशात नेऊन सोेडल्याचा आरोप आहे. सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी सोमवारी पत्रकारांना ही माहिती दिली.२००७ ते २०१७ या दहा वर्षांच्या कालावधीत नागपुरातून विदेशात गेलेली ५० मुले पुन्हा भारतात परतलीच नसल्याची बाब ब्रिटिश उच्चायुक्तांच्या लक्षात आली. त्यांनी चौकशीनंतर सप्टेंबर २०१७ मध्ये हे गंभीर प्रकरण भारतीय उच्चायुक्तांसह दिल्ली दूतावासाला कळविले. दिल्लीतून नागपूर पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर या गंभीर प्रकरणाची चौकशी सुरू झाली. गुन्हे शाखा आणि विशेष शाखेतून त्या दहा दाम्पत्यांचा पत्ता आणि त्यांना शोधण्यात आले. ज्या कुटुंबातील मुले विदेशात पाठविण्यात आली, त्यांचीही चौकशी करण्यात आली. त्यांची कागदपत्रे तपासली असता आरोपींनी पासपोर्ट आणि व्हिसा तयार करण्यासाठी मिळवलेली कागदपत्रेही बनावट असल्याचे लक्षात आले. ज्या शाळांची त्या कागदपत्रांवर नावे आहेत, त्या शाळा प्रशासनात पोलिसांनी चौकशी केली असता आम्ही ही कागदपत्रे उपलब्ध करून दिली नाही, असे शाळा प्रशासनाने पोलिसांच्या लक्षात आणून दिले.एका मुलामागे दोन लाखया सर्व प्रकरणाची सविस्तर आणि सखोल चौकशी केल्यानंतर पोलिसांनी विदेशात गेलेल्या मुलांच्या पालकांकडे कसून चौकशी केली. मुलांना इंग्लंडमध्ये बक्कळ पगाराची नोकरी मिळते, असे आरोपी दाम्पत्य सांगायचे. त्यांना तिकडे पोहचवून देण्यासाठी आरोपी दाम्पत्य प्रत्येक मुलामागे त्यांच्या पालकांकडून दोन लाख रुपये कमिशन उकळत होते, असेही पुढे आले. त्यामुळे पालकही आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना तगडी रक्कम देत होते, असे स्पष्ट झाले. या एकूणच घटनाक्रमातून आरोपींनी फसवणूक करून मुलांना विदेशात नेल्याचे चौकशीत उघड झाले. त्यामुळे पाचपावली ठाण्यात या प्रकरणाचा आज गुन्हा दाखल करून १० ही जोडप्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.ब्रिटिश अधिकारी चक्रावलेप्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून आपल्या परिवारातील मुलांना विदेशात घेऊन जाणारी ही दहा आरोपी जोडपी भारतात परत येताना मुलांना विदेशातच सोडून परततात, हा पहिला संशयास्पद मुद्दा ठरला. विशेष म्हणजे, एका दाम्पत्याने चक्क १९ मुले विदेशात आपली मुले म्हणून नेऊन सोडली. एखाद्या दाम्पत्याला १९ मुले असू शकतात, हा मुद्दाच खटकणारा होता. त्यामुळे सखोल चौकशी सुरू झाली. त्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली असता कागदपत्रे बनावट असल्याचेही त्यांच्या ध्यानात आले. प्रत्येक मुलांमधील अंतर तीन ते सहा महिनेच (गर्भधारणेला नऊ महिने लागतात) असल्याचे पाहून ब्रिटिश अधिकारीही चक्रावले.आरोपी दाम्पत्यांची नावेकंसात त्यांनी विदेशात नेलेली मुलेगुरुमीत तसेच तिचा पती राजेंद्रसिंग अटवाल (८ मुले), परमजीत आणि तिचा पती रुल्डासिंग गुजर (१९ मुले), सुरिंदर आणि तिचा पती जर्नलसिंग धोत्रा (६ मुले), जगविंदरसिंग आणि पियरासिंग ( ६ मुले), परमजितसिंग आणि सतवीरसिंग धोत्रा (२ मुले), कुलजीत आणि मनजीतसिंग धोत्रा (३ मुले), सतवंतसिंग निशांतसिंग धोत्रा (३ मुले) मनजीत आणि काश्मीरसिंग धोत्रा (२ मुले), निर्मल आणि अजितसिंग (४ मुले) परविंदर आणि तिचा पती अजितसिंग (४ मुले) तसेच जसविंदरसिंग बलबीरसिंग मुलतानी (५ मुले).