नागपूर : समृद्धी महामार्गावर १ जुलैच्या पहाटे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात होऊन २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या भीषण घटनेच्या ९ तासांनंतर ‘प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र’ (पीयूसी) देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आता पुढे आला. बस जळून खाक झाल्यावर पीयूसी मिळालीच कशी, हा प्रश्न आहे.
विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई १८१९ क्रमांकाची बसची नोंदणी २४ जानेवारी २०२० रोजी आरटीओकडे झाली. १० मार्च २०२३ रोजी आरटीओकडून फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आले. हे सर्टिफिकेट १० मार्च २०२४ पर्यंत वैद्य आहे. फिटनेस तपासणीत वेग नियंत्रक यंत्रही सुस्थितीत असल्याची नोंद आहे. बसचा परवाना २०२५पर्यंत वैध आहे.
१ जुलै रोजी पहाटे १ वाजून ३२ मिनिटांनी बसला अपघात झाला. त्याच दिवशी यवतमाळ येथील एका पीयूसी केंद्रावरून सकाळी १० वाजून ३७ मिनिटांनी ‘पीयूसी’ प्रमाणपत्र जारी करण्यात आले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या ‘वाहन डेटाबेस’वरही हे प्रमाणपत्र पहाता येते. या गंभीर प्रकारावर परिवहन विभाग काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात ‘बोगस’ पीयूसी प्रमाणपत्राचा व्यवसाय धडाक्यात सुरू असल्याचे हे ताजे उदाहरण असल्याचेही बोलले जात आहे.