सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमालीची वाढत असताना महानगरपालिकेकडून अद्यापही सक्षम योजना आरोग्य यंत्रणा उभारणीवर भर दिला जात आहे. परिणामी, रुग्णांना बेड मिळविण्यासाठी खासगीमध्ये जास्तीचे पैसे मोजण्याची वेळ आली आहे, तर शासकीय रुग्णालयांमध्ये ओळखीची किंवा नेत्यांचा शिफारसीची मदत घ्यावी लागत आहे. सामान्य रुग्ण मरणाच्या दारात उभा असल्याचे दाहक वास्तव आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत शासकीय रुग्णालयांमध्ये केवळ २३३, तर खासगी रुग्णालयांमध्ये १९४ खाटा शिल्लक होत्या. रात्री ७ वाजतानंतर या खाटाही फुल्ल झाल्याचे सांगण्यात येत होते. मेडिकलमध्ये बेड नसल्याने कॅज्यूल्टीमध्ये बेडच्या प्रतीक्षेत एका बेडवर कोविडच्या दोन रुग्णांना ठेवण्यात आले होते, रात्री हे बेडही फुल्ल झाले होते
नागपूर जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाला एक वर्ष झाले आहे. परंतु, स्थितीत बदल झालेला नाही. मोठ्या संख्येत रुग्ण वाढल्यास त्यांच्यावरील उपचाराचा प्रश्न अद्यापही कायम आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यापासून रुग्णांत वाढ होत असल्याचे दिसून येताच मानकापूर क्रीडा संकुलासमोरील मैदानात हजार खाटांचे सुसज्ज ‘जम्बो कोविड रुग्णालया’ची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली. परंतु, नंतर अधिकाऱ्यांनीच या घोषणेला मनावर घेतले नाही. यामुळे सप्टेंबर महिन्यात रुग्णांच्या नातेवाइकांवर बेड मिळविण्यासाठी ऐनवेळी धावाधाव करण्याची वेळ आली. काही रुग्णांचा याच धावपळीत जीवही गेला. ऑक्टोबर महिन्यापासून रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने व नोव्हेंबर महिन्यात दैनंदिन रुग्णसंख्या ५० पर्यंत आल्याने पुन्हा एकदा प्रशासनाला वाढीव खाटांचा विसर पडला. याच दरम्यान दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना, मेडिकलमध्ये ४०० खाटा वाढविण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निधीची तरतूद झाली. परंतु, यालाही गंभीरतेने घेतले नाही. परिणामी, पाच महिन्यांचा कालावधी लोटूनही रुग्णांपासून हे बेड अद्यापही दूर आहेत. मागील दोन दिवसांत मेडिकलमधील कोविड रुग्णालयातील तळमजल्यावरील ९० खाटांचा वॉर्ड सुरू करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी पुढाकार घेतल्याने, त्याला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांचे सहकार्य मिळाल्याने व कमी खाटेच्या समस्येची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून दखल घेतल्याने रात्री उशीरा परवानगी दिली. परंतु, आता या खाटाही भरल्याने पुन्हा तीच स्थिती निर्माण झाली आहे. ‘जम्बो’ रुग्णालयाची मागणी होऊ लागली आहे.
-शासकीय रुग्णालयात केवळ १५१५ खाटा
मेयो, मेडिकल, एम्स व मनपाचे तीन दवाखाने मिळून ऑक्सिजनचे केवळ १५१५ खाटा आहेत. गुरुवारी दुपारपर्यंत २३३ तर, व्हेंटिलेटरच्या २७१ पैकी ३९ खाटा शिल्लक होत्या. परंतु, रात्री ७ वाजतापर्यंत एकही खाट शिल्लक नसल्याचे सांगितले जात होते. रात्री मेडिकलच्या कॅज्युअल्टीमध्ये एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवून उपचार केले जात होते. ऑक्सिजनअभावी रुग्णांचे मृत्यूशी झुंज सुरू असल्याचे दाहक वास्तव होते.
- खासगीमध्ये २९३४ खाटा
शहरात सध्याच्या स्थितीत ७९ खासगी हॉस्पिटलमधून कोविड रुग्णांना सेवा दिली जात आहे. सर्व रुग्णालये मिळून २९३४ ऑक्सिजनचा खाटा आहेत. गुरुवारी दुपारीपर्यंत यातील केवळ १९४ खाटा रिकाम्या होत्या, तर २६१ व्हेंटिलेटरचा खाटांपैकी ३२ खाटा शिल्लक होत्या. परंतु, येथेही सायंकाळ होताच खाटा नसल्याचे सांगण्यात येत होते. काही मोठ्या खासगी रुग्णालयात खाटांच्या प्रतीक्षेत रुग्ण रुग्णवाहिकेत उपचार घेत असल्याचे धक्कादायक चित्र होते.
-खासगी छोट्या इस्पितळांमध्येही कोविड रुग्णालय
शहरात ७९ खासगी कोविड हॉस्पिटलमधून रुग्णांना सेवा दिली जात आहे. १० ते १५ खाटा असलेल्या छोट्या रुग्णालयांचाही कोविड रुग्णालयात समावेश केला जात आहे. खासगीमध्ये रोज खाटा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
-जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका