हिंगणा (नागपूर) : ११ वर्षीय बालक खेळून घरी परत आला आणि खाेलीत शिरला. काही वेळाने बहिणीला ताे लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्याने खाेलीतील छताच्या पंख्याला दुपट्ट्याच्या मदतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली हाेती. ही धक्कादायक व दुर्दैवी घटना एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील डिगडाेह येथे साेमवारी (दि. २) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
हंसराज कृष्णकांत राय (११, रा. पाेलिसनगर, डिगडाेह, ता. हिंगणा) असे मृत बालकाचे नाव आहे. हंसराजचे वडील कृष्णकांत मध्य प्रदेशात नोकरीला असल्याने ताे आई शीला व दाेन बहिणींसोबत त्याचे आजोबा (आईचे वडील) छोटेलाल राय यांच्याकडे डिगडोह येथे राहायचा. ताके सायंकाळी खेळून घरी आला तेव्हा आजोबा कार्यक्रमासाठी, तर आई एका बहिणीसोबत कामानिमित्त बाहेर गेली हाेती. त्याची दुसरी बहीण घरातील अन्य खाेलीत अभ्यास करीत हाेती.
हंसराज काही कळण्याच्या आत खाेलीत गेला आणि त्याने स्वत:ला छताच्या पंख्याला दुपट्ट्याच्या मदतीने गळफास लावून घेतला. काही वेळाने बहीण त्याच्या खाेलीत गेली असता, तिला हंसराज लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट हाेऊ शकले नाही. मात्र, खेळताना मुलांसोबत भांडण हाेऊ शकते. यातून त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी एमआयडीसी पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.
अलीकडे लहान मुले माेबाइल हाताळत असल्याने त्यांच्या मनावर विपरित परिणाम हाेत आहे. मुले अतिसंवेदनशील व हट्टी हाेत आहेत. पालक त्यांचे हट्ट पुरवितात. पालकांनी मुलांच्या हालचाली व वर्तनावर बारकाईने लक्ष द्यावे. त्यांचे अवाजवी हट्ट पूर्ण करू नये. शक्यताे त्यांना मोबाइलपासून दूर ठेवावे.
- भीमा नरके, ठाणेदार, पोलिस ठाणे, एमआयडीसी.