वर्धा : काही महिन्यांपासून आजारी असलेल्या मुलीचा घरातच मृत्यू झाला. परिस्थिती हलाखीची, अन् जन्मदाते वेडसर प्रवृत्तीचे. अशातच अंत्यसंस्कार कोण करणार, असा प्रश्न वडिलांनी उपस्थित केला आणि मग काय चक्क भावाने घरातच खड्डा खणून वेडसर बहिणीचा मृतदेह पुरला. ही धक्कादायक घटना तब्बल १० दिवसानंतर १३ रोजी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्रविणा साहेबराव भस्मे (३७) रा. आदर्शनगर असे मृत तरुणीचे नाव आहे. तर सेवाग्राम पोलिसांनी वडील साहेबराव चिंदुजी भस्मे (६८), आई मंदा साहेबराव भस्मे (६४), भाऊ प्रशांत साहेबराव भस्मे (३५) यांना ताब्यात घेतले.
प्राप्त माहितीनुसार, मृत प्रविणा मागील काही महिन्यांपासून आजाराने त्रस्त होती. ती वेडसर वृत्तीची असल्याने घराबाहेर कुठेही फिरत नव्हती. अशातच ३ जुलै रोजी रात्री सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास प्रविणाचा घरीच मृत्यू झाला. आता अंत्यसंस्कार कोण करणार, पैसे कोठुन आणणार असे अनेक प्रश्न कुटुंबियांसमोर उभे झाले. रात्रभर विचार करुन दुसऱ्या दिवशी ४ रोजी सकाळी ७ वाजता मुलीचा मृतदेह घरातच खड्डा खणून पुरविण्यात आला. याबाबतची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांना १३ रोजी दुपारी १२ वाजता मिळाली. पोलिसांनी तत्काळ आदर्शनगर गाठून घराची पाहणी केली असता घरात खड्डा खणल्याचे दिसून आले. पोलिसांनी तत्काळ याची माहिती तहसीलदार रमेश कोळपे यांना दिली. रात्री ७ वाजता फॉरेन्सिक चमूसह वैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू घटनास्थळी दाखल झाली आणि मृतदेह खड्ड्याबाहेर काढला.