धक्कादायक! नीटमध्ये ५३५ गुणांचे झाले ११० गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 10:29 PM2018-06-25T22:29:44+5:302018-06-25T22:30:33+5:30
जयताळा येथील आकांक्षा नितनवरे या विद्यार्थिनीच्या बाबतीत धक्कादायक प्रकार घडला आहे. ‘नीट’च्या आॅनलाईन गुणपत्रिकेत तिला ५३५ गुण दाखविण्यात आले होते. परंतु, प्रवेश प्रक्रियेला सामोरे गेल्यानंतर तिला केवळ ११० गुण मिळाल्याचे सांगण्यात आले. या घोळावर योग्य न्यायनिवाडा होण्यासाठी आकांक्षाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने सोमवारी सीबीएसईला नोटीस बजावून, यावर २७ जूनपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जयताळा येथील आकांक्षा नितनवरे या विद्यार्थिनीच्या बाबतीत धक्कादायक प्रकार घडला आहे. ‘नीट’च्या आॅनलाईन गुणपत्रिकेत तिला ५३५ गुण दाखविण्यात आले होते. परंतु, प्रवेश प्रक्रियेला सामोरे गेल्यानंतर तिला केवळ ११० गुण मिळाल्याचे सांगण्यात आले. या घोळावर योग्य न्यायनिवाडा होण्यासाठी आकांक्षाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने सोमवारी सीबीएसईला नोटीस बजावून, यावर २७ जूनपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकेतील माहितीनुसार, ‘नीट’चा निकाल लागल्यानंतर ४ जून रोजी आकांक्षाला ५३५ गुणांची आॅनलाईन गुणपत्रिका देण्यात आली. त्यानंतर तिने वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज दाखल केला. राज्य गुणवत्ता यादीत तिला ६४७ वा क्रमांक देण्यात आला. प्रवेश फेरी सुरू झाल्यानंतर तिला केवळ ११० गुण असल्याचे सांगण्यात आले. तसेच, तिला १९ जून रोजी ११० गुणांची गुणपत्रिका देण्यात आली. राज्य गुणवत्ता यादीत तिच्या ६४७ व्या क्रमांकावर सागरिका मनमाडगी या विद्यार्थिनीचे नाव टाकण्यात आले. सीबीएसईचे वरिष्ठ अधिवक्ता सी. एस. कप्तान यांनी न्यायालयामध्ये आकांक्षाची ओएमआर शीट सादर केली. त्यावरून तिला ११० गुण मिळाल्याचे दिसून येत आहे. परंतु, आकांक्षाने तिची ओएमआर शीट आॅनलाईन बघितली होती. त्यात तिला ५३५ गुण होते. गुणपत्रिकेवरही तितकेच गुण नमूद होते. त्यामुळे प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, असे आकांक्षाचे म्हणणे आहे. आकांक्षातर्फे अॅड. नंदेश देशपांडे यांनी बाजू मांडली.