नागपूर : एका गतिमंद आरोपीने त्याच्यावर नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला, अशी गंभीर तक्रार बुधवारी विशेष सत्र न्यायालयासमक्ष केली. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे व गुरुवारी दुपारी ३:३० वाजेपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश धंतोली पोलिसांना दिले. या धक्कादायक प्रकरणाने कारागृहातील वातावरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पीडित गतिमंद आरोपीविरुद्ध अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार आहे. त्या प्रकरणात नंदनवन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या आरोपीची बुधवारी पोक्सो कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात पेशी होती. त्यामुळे त्याला न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, त्याने कारागृहातील आरोपींना औषधे देणाऱ्या रोहण नामक व्यक्तीने अनैसर्गिक अत्याचार केला, अशी तक्रार केली. त्यानंतर न्यायालयाने त्याची तक्रार रेकॉर्डवर नोंदवून संबंधित निर्देश दिले. तसेच, पीडित आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्याची सूचनाही धंतोली पोलिसांना केली.
आरोपीचा जामीन अर्ज
पीडित आरोपीने सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. सरकारी वकील अॅड. रश्मी खापर्डे यांनी आरोपीने स्वतः केलेला गुन्हादेखील गंभीर स्वरूपाचा असल्याचे सांगून त्याला जामीन देण्यास विरोध केला.