नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शस्त्राच्या तस्करीत सहभागी असलेला कामठीचा कुख्यात गुंड शहबाज याने एमपीच्या शूटर्सची भेट कुख्यात नब्बूसोबत घडवून आणली होती. शूटर राजा आणि बाबांनी ५० लाखात हत्याकांडाची सुपारी घेतल्यानंतर नब्बू, शहबाज, राजा, बाबा आणि परवेज यांनी आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांडाची स्क्रिप्ट तयार केल्याची माहिती पुढे आली आहे. एखाद्या चित्रपटातील थरारक कथानक वाटावे, अशा आर्किटेक्ट निमगडे मर्डर मिस्ट्रीचा तब्बल पाच वर्षांनंतर उलगडा झाला. त्यानंतर आता या रहस्यमय हत्याकांडातील एक एक धक्कादायक पैलू उघड होत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, वर्धा मार्गावरील सोमलवाड्यातील ही शेकडो कोटींची जमीन आर्किटेक निमगडे यांच्यामुळे दुसऱ्या कुणाला बळकावणे कठीण झाले होते. त्यामुळे त्यांना हटवण्यासाठी काही जण प्रयत्नशील होते. त्यांच्याशी संपर्क साधून नागपुरातील गँगस्टर रंजित सफेलकर याने निमगडे यांची हत्या करण्यासाठी ५ कोटी रुपयांची सुपारी घेतली. रंजितचा साथीदार कालू हाटे यांनी ही सुपारी कुख्यात नब्बू ऊर्फ नवाब छोटे सहाब याला पलटविली. नब्बूने कामठीतील इस्माईलपुऱ्यात राहणारा शहबाज याच्याशी संधान साधले. ‘किसी का काम बजाना है, बहुत पैसे मिलेंगे,’ असे म्हणून त्याच्याकडे शूटर्सबाबत विचारणा केली. शहबाजने मध्य प्रदेशातील कुख्यात सुपारी किलर राजा आणि बाबाची नब्बूसोबत भेट घालून दिली. राजाने ५० लाख रुपये दिल्यास कुणाचाही गेम करण्याची तयारी दाखवली. ५० टक्के रक्कम ॲडव्हान्स आणि नंतर काम झाल्यावर बाकीची रक्कम देण्याचे ठरले. डील पक्की झाल्यानंतर नब्बूने कालूकडून वीस लाख रुपये आणून राजा आणि बाबाच्या हातात ठेवले. यावेळी ५० हजार रुपये शहबाजलाही देण्यात आले. राजा आणि बाबाने नंतर परवेजला सोबत घेतले. तिघे ६५ सप्टेंबर २०१६ला नागपुरात पोहोचले. त्यांनी नबूची भेट घेतली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच ६ सप्टेंबरला निमगडे यांची हत्या करण्याचे ठरवून सकाळपासून कामी लागले.
पिस्तूल घेऊन राजा आणि परवेज एका गाडीवर तर बाबा दुसऱ्या गाडीवर होता. नब्बूने त्यांना आधीच निमगडे यांचे फोटो दाखवले होते. कमाल चौक, गांजखेत चौक, गांधीबाग गार्डन, लाल ईमली गल्ली ते निमगडे यांचे घर या मार्गावर नब्बूने आपले साथीदार (टिपर) पेरले होते. ते सर्व निमगडे कुठून निघाले, कुणीकडे चालले याची माहिती मोबाइलवरून एकमेकांना देत होते. निमगडे लाल ईमली गल्लीत पोहोचताच बाबा समोर तर राजा आणि परवेजने मागून येऊन निमगडे यांना गाठले आणि त्यांची गोळ्या घालून हत्या केली. हत्या केल्यानंतर राजा, बाबा आणि परवेज मध्य प्रदेशात पळून गेले. त्यांनी शहबाजला फोन करून तशी माहिती दिली आणि नब्बूकडून रोकड घेऊन ठेवण्यास सांगितले होते.
----
टिपर्सला मिळाली वेगवेगळी रक्कम
निमगडे यांच्या हालचालीची माहिती देणाऱ्या प्रत्येक टिपरला नब्बूने वेगवेगळी रक्कम दिली. कुणाला ५० हजार, कुणाला ८० हजार, तर कुणाला एक लाख रुपये मिळाले.
-----
दोघे हादरले, रक्कम टाळली
ज्याची माहिती काढून दिली त्याची हत्या झाल्याचे आणि ही सुपारी किलिंग असल्याचे कळल्यामुळे हादरलेल्या दोन टिपर्सनी या प्रकरणात रक्कम घेण्याचे टाळले, अशीही माहिती पुढे आली आहे.
---