लोकमत विशेष
आनंद शर्मा
नागपूर : भारतीय चित्रपटांमध्ये रेल्वेस्थानक किंवा कोचमध्ये चित्रपटाची शूटिंग करण्यात येते. रेल्वेत केलेल्या चित्रपटांच्या चित्रीकरणाला प्रेक्षकांच्या वतीनेही चांगली पसंती मिळते. परंतु कोरोनाचा प्रभाव रेल्वेतील चित्रपटांच्या शूटिंगवर पडला. ९ महिन्यांपासून शूटिंग ठप्प झाली होती. आता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात चित्रपटांची शूटिंग पुन्हा रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे. परिस्थिती सामान्य होण्यासाठी आणखी चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
चित्रपटांच्या शूटिंगसाठी आतापर्यंत मुंबई रेल्वेला बॉलीवूडने आपला पहिला पसंतीक्रम दिला आहे. येथील तुर्भे, आप्टा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पनवेल, वठार, वाडी बंदर, सायन याशिवाय मध्य रेल्वेतील पुणे आणि कोल्हापूर रेल्वेस्थानकांवरही चित्रपटांची शूटिंग करण्यात येते. यामुळे रेल्वेला बराच महसूल मिळतो. मध्य रेल्वेला चित्रपटांच्या शूटिंगच्या माध्यमातून एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० पर्यंत १ कोटी ३३ लाख ८३ हजार ३७० रुपयांचा महसूल मिळाला. परंतु कोरोनामुळे शूटिंगवर ब्रेक लागल्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नाचा स्रोत थांबला. २९ ऑक्टोबर २०२० पासून पुन्हा शूटिंग सुरू झाली आहे. यामुळे २०२०च्या अखेरच्या ३ महिन्यात मध्य रेल्वेने १५ लाख ३९ हजार ५४३ रुपये मिळविले आहेत. लवकरच परिस्थिती सामान्य होऊन चित्रपटांच्या शूटिंगच्या माध्यमातून रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होईल, अशी अपेक्षा रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.
................
या चित्रपटांची झाली शूटिंग
कोरोनापूर्वी २०१९-२० मध्ये मध्य रेल्वेच्या रेल्वेस्थानक आणि कोचमध्ये रजनीकांतचा चित्रपट दरबार, सलमान खानचा दबंग ३, कंगना रनौतचा पंगा, शुभमंगल ज्यादा सावधान, रात अकेली है, चोक्ड, विजेता, मुंबई सागा, लालसिंह चड्डा, काली पिली, सूरज से मंगल भारी फिल्म, क्लास ऑफ ८३, समांतर, १००, वॉर स्टोरी, १९६२ वेबसीरिज, हरामी, अटेंशन व्हिजिटर्स या माहितीपटांची शूटिंग झाली. कोरोनामुळे ९ महिन्यांपर्यंत चित्रपट निर्माते रेल्वेपासून दूर राहिले. २०२०-२१ मध्ये ऑक्टोबरच्या अखेरपासून हसीन दिलरुबा व अनोखी तसेच वेबसीरिज समांतर २ च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.
...........
शूटिंगसाठी लवकरच ऑनलाइन बुकिंग
‘कोरोनामुळे ९ महिन्यापर्यंत रेल्वेत चित्रपट, वेबसीरिज, माहितीपटांची शूटिंग प्रभावित झाली होती. परंतु आता परिस्थितीत बदल होत आहे. शूटिंग पुन्हा सुरू झाली आहे. यामुळे पुढील ४ ते ५ महिन्यात परिस्थिती पूर्वपदावर येण्याची अपेक्षा आहे. चित्रपट निर्मात्यांसाठी रेल्वे स्टेशन, कोचच्या ऑनलाइन बुकिंगची सुविधा मध्य रेल्वेतर्फे लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
..............